!
मुंबई : एसटी महामंडळातर्फे सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या ”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानाचा” राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापक संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी संपूर्ण राज्यात ‘अ’ वर्गात प्रथम क्रमांक पटकावलेल्या चोपडा बस स्थानकाला (जळगाव) ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र, चषक देऊन गौरवण्यात आले. याबरोबरच ‘ब’ वर्गात राज्यात प्रथम आलेल्या भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाला २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याबरोबरच ‘क’ वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातील मेढा बस स्थानकाला १० लाख रुपये रोख बक्षीस आणि चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी श्री गिरीश देशमुख पुरस्कार प्राप्त विभागाचे विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. उत्तरा मोने यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी मांडले. (अभिजीत भोसले ) जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ