Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआर आर आबा ; असा नेता होणे नाही- महेश म्हात्रे

आर आर आबा ; असा नेता होणे नाही- महेश म्हात्रे

(पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख) राज्याच्या राजकारणातील प्रचंड उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज “एक स्वच्छ प्रतिमेचा नेता” म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांची चांगलीच उणीव भासतेय.
आबा आज हयात असते तर ते सदुसष्ट वर्षाचे झाले असते. ते आपला वाढदिवस मोजक्या मित्रांसह कुठेतरी दूर राहून साजरा करायचे. आज त्या सगळ्या आठवणी मनात कल्लोळ माजवताहेत. आणि त्यासोबत वाटते की आज,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेली सत्तास्पर्धा आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करणाऱ्या पवार कुटुंबात माजलेली दुफळी यावर त्यांची काय भूमिका असती ? अर्थात आर आर आबांचे समाजाधिष्टीत राजकारण आणि त्यांचा स्वभाव ठाऊक असणाऱ्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांनी शरद पवारांना अजिबात सोडले नसते. सध्या, आबांच्या सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व करतात. आबा जिवंत असते, तर हे जयंतराव शरद पवार यांच्यासोबत नसते. असते तरी प्रदेशाध्यक्ष बनू शकले नसते.
हे सांगायला कोण्या राजकीय पंडितांची गरज नाही.
आर आर पाटील, हा जात, सत्ता आणि पैशाचा “माज करण्याचा” अभिमान बाळगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सोज्वळ चेहरा होते.
आबांनी राजकारणात सत्तेपेक्षा सच्चेपणा जपला. सत्ता आल्यानंतर भल्या भल्या लोकांचं वागणं बदलतं. आबा मात्र सत्ता आल्यानंतर जास्त नम्र होताना दिसत गेले. त्यामुळेच त्यांचा साधेपणा, सातत्य आणि लोकाभिमुख वर्तन आजही लोक विसरलेले नाहीत.
महाराष्ट्रातील घराघरात यापूर्वी वसंतदादा पाटील यांना ‘दादा’ म्हणून ओळखले जायचे. यशवंतराव चव्हाण यांची ओळख “साहेब” म्हणून होती. त्यामुळे असेल कदाचित, यशवंतरावानंतरच्या बऱ्याच राजकारण्यांनी स्वतःला “साहेब” म्हणून घेणे पसंत केले. त्या सगळ्या साहेबांच्या गर्दीत ‘आबा’ या कौटुंबिक नावाने ओळखले जाणारे आर.आर. हे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. मंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतर मात्र ते नावापेक्षा कामाने ओळखले जाऊ लागले.
आज संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सफाई अभियानाची चर्चा होतेय. “संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान” ही गावांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्याची मूळ कल्पना आबांची. या योजनेचा प्रारूप आराखडा बनवायला सचिवांच्या नेतृत्वाखाली जी शासकीय समिती नेमली होती, त्यात दोनच अशासकीय सदस्य होते. एक मी आणि दुसरे कवी केशव मेश्राम सर. ग्रामस्वच्छते सोबत अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण प्रसार आणि आणि सर्वांगीण उन्नतीसाठी प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांच्याशिवाय दुसऱ्या अन्य नावाची आम्ही चर्चाच केली नाही. नाही म्हणायला दोन-तिन राजकीय नावे सुद्धा समोर आली होती. पण त्यांच्यापर्यंत चर्चा पुढे गेलीच नाही. आणि एकमताने
“संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियान” असे या योजनेचे नामकरण आम्ही दोघांनी केले. आणि त्याला आबांसह सगळ्यांनी उचलून धरले. त्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाची एक उपयोजना सुद्धा आम्ही सुचवली होती. पण ती पुढे तेव्हढी प्रसिध्द झाली नाही.
या ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या योजनांनी, एरवी दुर्लक्षित राहणाऱ्या ग्रामविकास विभागाचे आणि त्या खात्याच्या मंत्र्याचे महत्त्व कित्येक पटीने वाढवले. त्यातील लोक सहभागाच्या कल्पना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत दिले जाणारी पारितोषिके. गाव पातळीवरील पत्रकारांना या योजनेच्या निमित्ताने शासकीय कामात सामावून घेण्याचा झालेला प्रयोग , हे सगळं अभूतपूर्व होतं. परिणामी आर आर पाटील यांचे नाव गाजू लागले.
घराघरात शौचालय असावे यासाठी ग्रामविकासमंत्री असताना आर.आर. पाटील यांनी घेतलेला पुढाकार आजही गावखेड्यातील लोकांना ठाऊक आहे. ग्रामीण भागातील जलपुरवठा योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जाव्यात, यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय लक्षावधी लोकांच्या लक्षात आहेत. परंतु त्याहीपेक्षा आबा लोकांच्या लक्षात राहिले काही वादग्रस्त निर्णयांमुळे.
मुंबईतील डान्सबार बंदीसंदर्भात त्यांनी घेतलेली कठोर भूमिका नेहमीच चर्चेत राहिली. मध्यरात्रीची मुंबई शांत आणि सुरक्षित राहावी यासाठी आबांनी डान्सबार बंदीची अंमलबजावणी केली होती. काळाचा दुदैर्वी खेळ कसा असतो पाहा ना. मुंबईतील नाईट लाईफची काळजी घेणारा हा लोकोत्तर नेता जेव्हा अखेरच्या घटका मोजत होता. त्यावेळी शिवसेनेचं युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आणि तत्कालीन सरकार मुंबईतील नाईटलाईफ पुन्हा ‘जिवंत’ करण्याची चर्चा करत होते… कालाय तस्मै नमः

सांगली जिल्ह्यातील तासगाव जवळच्या अंजनी या छोट्या खेड्यात आर.आर. पाटील यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईच्या साथीने आर.आर. आबा यांनी अगदी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी घेतली. अगदी सोळा-सतराव्या वर्षी अंगावर पडतील ती कामे करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच भाषणाची आवड असणार्‍या आबांनी शालेय आणि महाविद्यालयीन काळातील सर्वच वकृत्व स्पर्धांवर विजयी मोहोर उमटवली होती. वकृत्व स्पर्धेत मिळालेली बक्षिसाची रक्कम बर्‍याचदा परीक्षा फी भरण्यासाठी त्यांना उपयोगी पडत असे. आबांचा हा भाषणाचा वारसा त्यांची कन्या स्मिता आणि मुलगा रोहित यांनी बर्‍यापैकी जपलेला दिसतो. आबांच्या अकाली निधनानंतर वहिनींनी बऱ्यापैकी मतदारसंघ सांभाळला. आता रोहितच्या उगवत्या नेतृत्वाला तासगांव आणि शेजारच्या मतदारसंघात बऱ्यापैकी मान्यता लाभत आहे.
महाविद्यालयात असतानाच आर आर आबांनी आपल्या नेतृत्वगुणाची चमक लोकांना दाखवली होती. कायद्याचं शिक्षण पूर्ण करतानाच त्यांनी राजकारणाची वाट धरली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येताना त्यांनी दाखवलेली तडफ सांगली जिल्ह्यातील लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या नजरेस पडली. ज्या तरुणासाठी शेकडो शिकलेली मुले सायकलवर प्रचार करतात आणि काहीही खर्च न करता निवडणूकही जिंकतात हे चाणाक्ष वसंतदादांनी अचूकपणे हेरले आणि लोकनेते वसंत दादांच्या परिसस्पर्शाने आर.आर. आबांचा खर्‍या अर्थाने राजकीय उत्कर्ष सुरू झाला. त्या काळात ज्यांचा सांगलीच्या राजकारणात दबदबा होता अशा, दिनकर आबा पाटील या प्रस्थापित नेतृत्वाचा पराभव करून आबा आमदार झाले. आणि सांगलीची मुलुखमैदान तोफ मुंबईच्या विधिमंडळात धडाडू लागली. विधानसभेतील आबांचे कार्यकर्तृत्व हा खरे तर अभ्यासाचा विषय आहे. राज्यातील प्रत्येक प्रश्न समजून घेऊन त्यावर सखोलपणे आणि संयमाने बोलणे या गुणांमुळे आबा अल्पावधीत लोकप्रिय झाले. लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी जी समयसूचकता लागते, ती आबांकडे निश्चितच होती. त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब गुरव आणि स्व.सुभाष अण्णा कूल यांचे स्वीय सहाय्यक भगवान जगताप या दोघांच्या प्रयत्नाने सगळ्या महत्त्वाच्या चर्चा आबा आणि सुभाष अण्णा यांच्या नावाने लागत. आणि या लक्षवेधक विषयांवर आबा आणि अण्णा यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी अवघे विधिमंडळ तप्त व्हायचे. तर कधी त्यांच्या राजकीय प्रतिभेने थक्क व्हायचे.
विशेषत: १९९५ नंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर, आबांच्या भाषणांना आवेश आणि उपरोधाची धार चढलेली दिसायची. आबांच्या वक्तव्याने अवघे सभागृह कधी मंत्रमुग्ध व्हायचे, तर कधी त्यांच्या स्फोटक वाक्यांनी वातावरण तणावपूर्ण होत असे. परंतु ज्यावेळी ते हलक्या-फुलक्या विषयांवर बोलायला उभे राहायचे तेव्हा अवघे सभागृह हास्यकल्लोळात बुडालेले असायचे. मंत्री झाल्यानंतर सुद्धा आबांमधील आक्रमकपणा कधीच कमी झाला नव्हता. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर ते आपण मंत्री आहोत, हे विसरून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बिनधास्तपणे बोलायचे. त्यांचा हा मोकळेपणा त्यांना अनेकदा तापदायकही ठरायचा. पण आबा आपली सामाजिक बांधिलकी सोडायला तयार नसत. शेती-शेतकरी आणि ग्रामीण जीवन हा आबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आपल्या अवतीभोवतीच्या समाजातील कोणत्याही निरपराध व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी ते सतत धडपडायचे. नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वीकारून आबांनी समाजातील तळागळातील माणसांसोबत आपली बांधिलकी स्पष्ट केली होती. त्यांचे अवघे आयुष्य म्हणजे संकटांचा संघर्षमय प्रवासच होता. पण तरीही त्यांच्या वर्तनात कधीच कटुता दिसत नसे. आपल्याला मिळालेले पद हे लोकसेवेसाठी आहे आणि अवघे आयुष्य लोकांसाठीच असावे यावर ते ठाम होते. त्यासाठी त्यांनी कधीच कुटुंबाची पर्वा केली नाही. आजच्या जमान्यात जेव्हा बहुतांश राजकारणी आपल्या पुढील पिढ्यांच्या उदरनिर्वाहाची सोय लावण्यात मग्न असतात त्याच काळात आर.आर. आबा आपलं सर्वस्व समाजचरणी वाहण्यासाठी धडपडत होते. एकदा आम्ही प्रवासात होतो, मध्यरात्री एक दिड वाजता त्यांचा मोबाईल वाजला, पलीकडून कुणीतरी आपली कैफियत ऐकवत होता… आबा, शांतपणे ऐकत होते. त्याला दिलासा देत होते.
मी आबांना विचारलं, ‘कुणाचा फोन होता?’ ते उद्गारले, “सांगलीतून फोन होता, एका शेतकर्‍याच्या पिकात जनावरं घुसली होती. आता मी मुंबईतून ती जनावरं हाकलणार होतो का..? मला फोन करून मी काही त्याचे नुकसान भरून देणार आहे का…? नाही ! पण माझ्याशी बोलण्याने त्याचे दु:ख हलके झाले असावे, म्हणून त्याने फोन केला असावा, मग वेळ काळ कोणताही असो, मी बोलतो. कुणाला टाळत नाही. आज मी जो काही आहे, ते सारे या सर्वसामान्य माणसांच्या प्रेमामुळे. माझ्यासारखा गरीब घरातील कार्यकर्ता या महाराष्ट्रातील लोकांच्या प्रेमामुळे उपमुख्यमंत्री झाला. माझ्या कातडीचे जोडे केले तरी मराठी जनतेचे हे उपकार मी विसरू शकणार नाही.”
आबांच्या प्रांजळ स्वरातील ते उद्गार आजही मला आठवताहेत.

आजच्या पंचतारांकित राजकीय दुनियेत अशी सामाजिक बांधिलकी जपणारा नेता पुन्हा होणे नाही.
आबांच्या पुण्यस्मृतींस विनम्र अभिवादन !

  • महेश म्हात्रे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments