
प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसर्वेक्षणाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी ‘मातोश्री’च्या खास वर्तुळातील 21 निरीक्षक आज आणि उद्या (ता. 13 आणि 14 ऑगस्टला) राज्यातील मुंबई वगळता सर्व जिल्ह्यातील लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.
यामध्ये विधानसभा मतदारसंघातील बूथवार निकाल, नवीन राजकीय समीकरणे, जातीय-धार्मिक विवाद, युवा मतदारांचा कल समजून घेणार आहेत. या 21 निरीक्षकांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नुकताच दिल्ली दौरा झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळाल्यानंतर राज्यात गेल्या अडीच वर्षात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरतो. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटप सुरू होईल.
तत्पूर्वी हे राज्यव्यापी सर्वेक्षण कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी स्वतः हाती घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी जे निरीक्षक नेमले आहेत, त्या नेत्यांना त्यांचे प्रभावक्षेत्रातून लांब ठेवले आहे. त्यांना अन्य भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्वेक्षणात अनिल देसाई, संजय राऊत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई सारख्या 21 नेत्यांची निवड करण्यात आली आहे.
लोकसभा, विधानसभा किंवा इतर स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेतर्फे स्थानिक लोकाधिकार समिती मतदारसंघाचा आढावा सादर करत असते. यावेळी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. दोन दिवसांत या परिस्थितीचा अहवाल येईल. त्यावर उद्धव ठाकरे या सर्व निरीक्षकांशी स्वतः चर्चा करणार आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आव्हान किती? ते खरचं आहे का? मुख्यमंत्री असल्याने प्रशासन कुठे मदत करते का? याचाही सर्वंकष विचार या दोन दिवसांत निरीक्षक करणार आहेत.
नेमलेले निरीक्षक आणि कंसात ठिकाणं
संजय राऊत (बुलढाणा आणि अकोला), विनायक राऊत (हातकणंगले आणि कोल्हापूर), अमोल कीर्तिकर (नागपूर आणि रामटेक), मिलिंद नार्वेकर (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), अनिल देसाई (नाशिक आणि दिंडोरी), अरविंद सावंत (अहमदनगर आणि शिर्डी), भास्कर जाधव (नांदेड आणि हिंगोली), अनिल परब (जालना आणि छत्रपती संभाजीनगर), सुनील प्रभू (ठाणे आणि कल्याण), राजन विचार (शिरूर आणि बारामती),
अंबादास दानवे (सोलापूर आणि माढा), वरुण सरदेसाई (पुणे आणि मावळ), संजय जाधव (अमरावती आणि वर्धा), संजय देशमुख (भंडारा आणि गडचिरोली), नागेश आष्टीकर (चंद्रपूर आणि यवतमाळ), ओमराजे निंबाळकर (रावेर), भाऊसाहेब वाकचौर (बीड आणि परभणी), विनोद घोसाळकर (सातारा आणि सांगली), सचिन आहिर(पालघर आणि भिवंडी), नितीन देशमुख (लातूर आणि धाराशिव), कैलास पाटील (नंदूरबार आणि धुळे).