Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रप्रस्थापितांनी बाजूला व्हावे तरच गरिबांना मिळणार न्याय - अजित निकम

प्रस्थापितांनी बाजूला व्हावे तरच गरिबांना मिळणार न्याय – अजित निकम


सातारा (अजित जगताप) : मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या सातारा दौऱ्यामध्ये मराठा समाजाबद्दल त्यांनी जीवाची पर्वा न करता बाजी लढवली. यामुळे मोठ्या आशेने आलेल्या गरीब मराठा युवकांमध्ये चैतन्य पसरले आहे. परंतु मराठा योद्धा श्री जरांगे- पाटील यांचे आंदोलन प्रस्थापित मराठा हायजॅक करत असल्याने गरीब मराठ्यांना न्याय मिळणार का? असा मार्मिक प्रश्न मराठा समाजाचे गरिबीतून संघर्ष करत उद्योजक झालेले अजित निकम यांनी विचारला आहे.
आगामी निवडणुकीत सातारा जिल्ह्यात मराठा मतदारांची ताकद दाखवण्यासाठी वेळ पडल्यास प्रस्थापितांना बाजूला केल्याशिवाय गरीब मराठ्यांना न्याय मिळणार नाही. अशी भीती त्यांनी व्यक्त केली. छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये गोरगरीब कष्टकरी शेतकरी व बारा बलुतेदारांना सहकार्य करणारा गरीब मराठा हा सरकारच्या आरक्षण धोरणापासून वंचित आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून गाव गाड्यातील अल्पसंख्याक, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व सर्व बलुतेदार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
खरं म्हणजे ही लढाई अहमदनगरच्या कोपर्डी येथून दिनांक १३ जुलै २०१६ रोजी झालेल्या मराठा मुलीच्या बलात्कार व खुनाच्या संदर्भात सुरू झाली. आज ती मराठा समाजाला इतर मागासवर्गीय गटातून आरक्षण मागण्या पर्यंत पोहोचली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावरून आठ वर्षांपूर्वी औरंगाबाद, बीड, अकोला, नवी मुंबई, अहमदनगर, पुणे, यवतमाळ, वाशिम, सांगली ,सातारा व इतर जिल्ह्यातून मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला . महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वसामदारांनी पाठिंबा देऊन हा प्रश्न निकाली निघावा असे धोरण राबवले होते. आजही मराठा समाजाच्या घटनात्मकरीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही.
गेल्या आठ वर्षांमध्ये मराठा समाजातील आमदार- खासदार निवडून येत आहेत. आणि त्यांच्यासोबत प्रस्थापित मंडळी सत्तेची ऊब घेत आहेत. याच मंडळींमुळे सहकार क्षेत्रामध्ये व खाजगी शिक्षण संस्था असो अथवा सहकारी बँका व इतर व्यवसाय असो यामध्ये गरीब मराठांना स्थान मिळत नाही. हे अनेकदा अधोरेखित झालेले आहे. सातारा जिल्ह्यात आर्थिक दुर्बल घटक मधून आजही प्रस्थापितांना संधी दिली जाते.
मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणाने पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्यावर सातारा जिल्ह्यातील गरीब मराठ्यांचा परिपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. ही आनंदाची बाब आहे. आज श्री मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन काही प्रस्थापित मंडळीच हे आंदोलन हायजॅक करत आहेत का काय ? असा प्रश्न मराठा समाजातील गरिबांना पडलेला आहे. पोटाला जात नसते पण जातीला पोट असते. याचे आता प्रस्थापित मराठ्यांनी भान ठेवले पाहिजे.
आदरणीय मराठा योद्धा श्री. जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणारे ११३ आमदारांना पाडणार असा गर्भित इशारा दिलेला आहे. या ११३ आमदारांमध्ये गेली आठ वर्षे सत्तेची ऊब घेणाऱ्या व गरीब मराठा समाजाला न्याय न देता प्रस्थापितांना सहकार्य करत आहेत. तेच काही आमदारांना पुन्हा निवडून आणणार का ? असा मार्मिक प्रश्न मराठा गरीब युवक विचारू लागलेले आहेत. काही प्रस्थापित मंडळी सत्ताधाऱ्यांची बाजू घेतात. समर्थन करतात आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण मिळावे. यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजे. यातील काही जण खरोखरच प्रामाणिक आहेत. त्याबद्दल आमचे दुमत नाही. त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून गरिबांना न्याय द्यावा.
सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांची भूमी आहे. आंतरवाली सराटीत दिनांक २९ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील काही गोरगरीब मराठा येऊ शकत नाहीत. त्यांच्या ऐवजी प्रस्थापित मंडळी पुन्हा ये रे माझ्या मागल्या हीच री ओढणार असतील. तर त्याचा विचार होणे गरजेचे आहे. असे श्री. निकम, सुरेश मोरे, राजेंद्र कदम, संजय पवार, विकास भिलारे या गरीब मराठा बांधवांनी मत व्यक्त केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देताना आरक्षणाचे लाभार्थी यांनी सुद्धा याची जाणीव ठेवावी. काही पंगतीला अगोदर व्ही.आय.पी. लोकांना जेवण वाढले जाते. त्यानंतर इतर लोकांचा विचार होतो. मराठा आरक्षणाबाबत असे होऊ नये. अशी गरीब मराठा युवकांची रास्त मागणी आहे. त्याची आता ग्रामीण भागात चांगलीच चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान, मराठा योद्धा श्री मनोज जरांगे- पाटील यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी. त्यांना दीर्घायुष्य लाभो. यासाठी गोरगरीब मराठा समाजातील अनेकांनी आपापल्या देव्हार्‍यातील देवाची पूजा केली आहे. तसेच त्यांच्या लढ्याला यश मिळावं अशी प्रार्थनाही केली आहे. यावेळी मराठा बांधवांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड देण्यात यावा. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्या यांचा पुनरुच्चार केला आहे.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments