प्रतिनिधी : अंधेरीतील खड्डेमय रस्ते, घरात, परिसरात साचलेलं पाणी, खचणारे डोंगर अशा प्रचंड दुरवस्थेच्या अनेक तक्रारी मुंबई जोड़ों न्याय यात्रे दरम्यान लोकांनी मांडल्या. कॉंग्रेसने विकासकामांसाठी मंजूर केलेला निधी भाजप आमदाराने वापरू दिला नाही. कंत्राटातील कमिशन मिळवण्यासाठी भाजप आमदार विकासकामं रखडवत आहेत, असा घणाघाती आरोप मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.
मुंबई जोड़ों न्याय यात्रेचा मुंबईभर झंझावात सुरू आहे. गेल्या दोन दिवसात कुलाबा, अंधेरी, मुंबादेवी, वर्सोवा या भागातून पदयात्रा सुरू आहेत. खासदार वर्षाताई गायकवाड तसंच मूंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होत आहेत. या पदयात्रांचा धसका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. या पदयात्रांना परवानगी मिळू न देण्याचा प्रयत्न आता सत्ताधारी पक्ष करत आहेत.
कुलाबा येथील पदयात्रेतून पाणी माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला. अंधेरीत तर भाजप आमदारच कमिशनसाठी विकासकामांना खोडा घालत असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. अंधेरीत सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र याबाबत स्थानिक आमदार निष्क्रिय असल्याच्या तक्रारींचे पाढे लोक वाचत होते. या रस्त्यांच्या अवस्थेने लोकांचे अपघात होत आहेत.
गिल्बर्ट हिल, गावदेवी डोंगराचा काही भाग कोसळला. लोक जीव मुठीत घेवून रहातायत. लोकांच्या सुरक्षिततेसाठी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोकभाऊ जाधव यांनी 5 कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर करून घेतला. मात्र अमित साटम यांनी आकसाने हे काम होवू दिलं नाही. भाजप आमदार लोकांच्या जीवाशी खेळतोय, असा संतापही खासदार वर्षाताईंनी व्यक्त केला आहे.
आंबोली धकुशेट पाडा तर कायम पावसाच्या पाण्यात असतो. इथली नालेबांधणी आणि इतर सुविधांसाठी नगरसेविका अल्पा जाधव यांनी 130 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. यातील केवळ 25 लाखांचं काम झालं आहे. 120 कोटीचा निधी हा रेल्वे अंडर ग्राउंड लाईन टाकण्यासाठी मंजूर झाला. पण कंत्राटदारांकडून कमिशन उकळण्यासाठी साटम यांनी देवेंद्र फडणविसांना सांगून हे काम रोखून धरलं. परिणामी हा सगळा परिसर साचलेल्या पाण्यात आहे. लोकांना मन:स्ताप होत आहे.
रखलेल्या एसआरए प्रकल्पांतून बेघर झालेले, असुविधांमुळे त्रासलेल्या लोकांनीही या पदयात्रेत आपल्या व्यथा मांडल्या. फेरिवाल्यांच्या एका शिष्टमंडळानेही वर्षाताईंची भेट घेवून ‘फेरिवाला झोन’ नसल्याने आमदारांच्या गुंडांची दादागिरी सुरू असल्याचं सांगितलं. या हप्तेबाजीने नागरिक हैराण आहेतच, पण सर्वत्र बकाल अवस्था पहायला मिळतेय.