प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे.अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे मुंबईत निधन झालं आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे निधन झाले. विजय कदम १९८० आणि ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या.
विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक मोठी हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम ६७ वर्षांचे होते. पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी – ओशिवरा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विजय कदम यांचे चित्रपट आणि नाटके
विजय कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. ‘विच्छा माझी पुरी करट हे त्यांचं लोकनाट्य आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. १९८०च्या दशकात छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.
त्यांचे चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी हे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर त्यांचं जाणं सिनेसृष्टीसाठी मोठी हानी असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली आहे.
प्रशांत दामलेंनी व्यक्त केला शोक
त्यांचं जाणं खूप धक्कादायक आहे. खूप सपोर्ट करणारा अभिनेता गेला. सहकाऱ्यांना नेहमीच ते सपोर्ट करत होते. माझा पहिला चित्रपट मी त्यांच्यासोबत केला होता. त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं होतं. त्यांचं जाणं खूप धक्कादायक आहे. आपण नाटकात जे रिअॅक्ट करतो तसं रिअॅक्ट चित्रपटात करायचं नसतं असं त्यांनी मला समोर उभं राहून बसून शिकवलं होतं. समजून सांगितलं होतं. शिकण्याची आणि शिकवण्याची त्यांची इच्छा फार मोठी होती, असेही अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे.