ठाणे : दि ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शासन स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.
शासनाने निश्चित केलेल्या निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. शासनाने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या किंवा करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच स्पर्धेसाठी अर्ज करावयाचा असून अर्जाचा नमुना, गुणांकनाचे निकष, आवश्यक कागदपत्रे, फोटो व व्हिडीओबाबत तपशील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.३१ जुलै २०२४ च्या शासन निर्णयामध्ये दिला आहे. (हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेसाठीचे परिपूर्ण अर्ज प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांच्या mahotsav.pida@gmail.com या ई-मेलवर दि.३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाईन सादर करावयाचे आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त झालेले जिल्हानिहाय अर्ज प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास दि.0५ सप्टेंबर २०२४ पूर्वी उपलब्ध करुन देतील.
जिल्हास्तरीव निवड समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळास अभिप्रायासह गुणांकन देईल. जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे कला अकादमी यांच्यामार्फत ई-मेलद्वारे राज्यस्तरीय निवड समितीकडे करेल.
राज्यस्तरीय समिती प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील. राज्यस्तरीय पहिल्या ३ विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल.
पारितोषिकांची रक्कम पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक रु.५.00 लक्ष, द्वितीय क्रमांक रु.२.५ लक्ष, तृतीय क्रमांक रु.१.०० लक्ष.
वरीलप्रमाणे ३ विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रु.२५ हजार चे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येईल, अशी माहिती ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हास्तरीय गणेशोत्सव समितीचे सदस्य सचिव श्री. वैभव कुलकर्णी यांनी दिली आहे.
