Wednesday, October 15, 2025
घरमहाराष्ट्रज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार...

ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर


मुंबई : संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि झुंजार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार श्री. रमेश झवर यांची निवड केली आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. शाल, श्रीफळ, रु.११०००/-, पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक ‘मराठा’मध्ये काम केलेले श्री. झवर हे पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. दैनिक ‘मराठा’ ते दैनिक ‘लोकसत्ता’ असा त्यांचा सलग प्रवास आहे. या कालावधीत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक, सहसंपादक अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये व्यापार उद्योग पुरवणी (कॉमर्स विभाग) व प्रादेशिक विभाग हेही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. संपादकीय पानावरील लेख, स्फुट तसेच लोकसत्ताचे अनेक अग्रलेखही त्यांनी लिहिले आहेत. निवडणुका, साहित्य संमेलने, देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे त्यांनी वृत्तांकन केले आहे.
वयाची ८० वर्षे पार केलेल्या श्री. झवर यांचे आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे. त्यांचा ब्लॉग लोकप्रिय झाल्यावर rameshzawar.co.in ही स्वत:ची वेबसाईट त्यांनी सुरू केली. या साईटलाही देश विदेशात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते.
श्री. झवर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात आले असून निवड समितीने केलेल्या सहकार्याबद्दलही मुंबई मराठी पत्रकार संघ समितीचे आभारी आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments