सातारा (अजित जगताप) : गेली साडेअकरा महिने गरजवंत व गरीब मराठ्यांसाठी लढा उभा राहिलेला आहे. हा लढा बंद करण्यासाठी सगळ्यांनी ताकद लावली आहे. राजकीय नेत्यांनी दबाव आणला तर घरी बसू नका. टी.व्ही.वर बघू नका. मैदानात उतरा अशा शब्दात मराठा योद्धा श्री मनोज जरांगे- पाटील यांनी सातारच्या ऐतिहासिक भूमीमध्ये पुन्हा एकदा एल्गार पुकारला.
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या मराठा योद्धा श्री जरांगे- पाटील यांचे कोल्हापूर येथून सातारा जिल्ह्यात आगमन होताच सातारा जिल्ह्याचे हद्दीत कराड, उंब्रज, शेंद्रे ,बॉम्बे रेस्टॉरंट अशा अनेक ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. गरीब व कष्टकरी मराठा व्यतिरिक्त अल्पसंख्यांक, मागासवर्गीय तसेच अनेक मान्यवरांनी मनापासून श्री जरांगे- पाटील यांचे स्वागत केले. त्यांना पुष्पहार व फेटा तसेच शाल देऊन गौरव केला. नियोजित कार्यक्रमाच्या तीन तास विलंबानंतरही मराठा समाजातील गोरगरीब माता-भगिनी युवक युवती व तरुण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सामील झाले होते.
सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्री जरांगे- पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी मोठा जयघोष करण्यात आला. सातारचे मराठा सकल बांधवांच्या वतीने पत्रकार शरद काटकर यांनी श्री जरांगे पाटील यांच्या हाती पुष्पहार देऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घेऊन गेले. अनेकदा उपोषण केल्यामुळे श्री जरांगे पाटील यांना पायरी चढत असताना त्रास जाणवत होता. हे पाहून अनेक जण हळहळ होते. त्यानंतर भव्य रॅली मोती चौक मार्गे राजवाड्याच्या दिशेने गेली. गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेमध्ये ओ.बी.सी. नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेत त्यांनी राजकीय टीका केली . तसेच या आंदोलनापासून लांब असलेल्या मराठा समाजातील लोकांना सुद्धा चांगल्या कान पिचक्या दिल्या. आपल्या शरीरातील वेदना जाणवत असताना सुद्धा श्री मनोज जरांगे- पाटील हे ही लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी कमरेला पट्टा बांधून सज्ज झाले होते. मराठा समाजाला घराच्या बाहेर पडावे लागेल. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. संकट उभे असून दबावाला बळी पडू नका. अन्यथा आपली लेकर आयुष्यभर माफ करणार नाही. ही लढाई गरिबांच्या साठी असून संकट कायमचे दूर करायचे आहे. गरिबांच्या जीवावर ही लढाई लढत आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळेला माण -खटाव येथील मराठा समाजाने ही या रॅलीमध्ये सहभाग घेतला. तसेच जावळी, सातारा, महाबळेश्वर ,खंडाळा ,वाई, पाटण, कराड, फलटण या ग्रामीण भागातील अनेक जण मिळेल त्या वाहनाने साताऱ्यात आले होते.
सदर रॅली साताऱ्यात आल्यामुळे गरीब व कष्टकरी, शेतमजूर शेतकरी मराठा समाजाने एकच जल्लोष केला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी या लढाई बाबत छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातूनच पुन्हा एकदा एल्गार पुकारल्याचे दिसून आले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने अनेक मान्यवर उपस्थित होते. या महा रॅलीमध्ये अनेक जण सेल्फी काढून या ऐतिहासिक क्षण आपापल्या मोबाईल कॅमेरात टिपत होते.
