(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात सध्या भाजप पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे. नागपंचमीच्या सणाला हे भूमिपूजन खऱ्या अर्थाने भाजप नवीन कार्यकर्त्यांसाठी आशास्थान ठरणार आहे. केंद्रात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्यात आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी जोड गोळी विकास कामे करत आहे. परंतु, दुर्दैवाने साताऱ्यात भाजप निष्ठावंत आदरणीय व दिवंगत डॉ. गजाभाऊ तथा गजेंद्र कुलकर्णी यांच्यासारखे वैचारिक भूमिका असलेले हाडाचे कार्यकर्ते म्हणजे गजेंद्र विचार दिसत नाहीत. अशी खंत आता जुने जाणते जनसंघाचे अनुभव पाठीशी असणारे व्यक्त करत आहेत.
मुळातच भारतीय जनता पक्ष १९८० साली स्थापन झाला. परंतु त्याची खरी पाळमुळे रुजवण्याचे काम १९५१ साली आदरणीय हिंदुत्ववादी विचाराची कास धरणारे शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे. असे आदरणीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी दोन खासदार ते स्वबळावर भाजपची सत्ता आणण्याचे काम मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात करून दाखवले. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी व शिवसेना अशा तीन पक्षाची महायुती आहे. तीन तिघाड काम बिघाड असं त्याचे वर्णन केले तर वावगे ठरणार नाही. यामध्ये फक्त भाजप पक्षाचे प्रामाणिकपणाने दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यात भाजपसाठी आमदार व खासदार होण्याचा मान हा फक्त श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनीच मिळवलेला आहे. त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने भाजपचे वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे .
सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या ठिकाणी क्रांती होते. हीच क्रांती इतिहास घडवते. आता सातारा जिल्ह्यात राजकीय इतिहास घडवण्याचे दिवस दिसू लागलेले आहेत. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर एकेकाळी काँग्रेस म्हणजेच राजकीय पक्ष असे समीकरण होते. त्याला छेद देण्याचे काम ज्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केले. विशेषता जनसंघापासून किंवा राष्ट्रीय स्वयं संघातून भारतीय मजदूर संघ असेल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अथवा हिंदुत्ववादी संघटना अशा संलग्न असणाऱ्या संघटनेतून निर्माण झालेले बाळासाहेब कदम, डॉ.गजाभाऊ कुलकर्णी, दिनकर शालगर, राजाभाऊ देशपांडे, डॉ. दिलीप येळगावकर,सुधाकर आपटे, मधु सरस्वती पवार, नामदेव घाडगे, उषाताई कुबेर, माई जकातवाडीकर, दादासाहेब जाधव, बाबासाहेब फाटक, आफळे ,विनायकराव ढवळे, सुभाष दांडेकर, अजित कुबेर, विलास आंबेकर, दत्ताजी थोरात, हरिभाऊ कुलकर्णी, अमित कुलकर्णी, नितीन फरांदे, किशोर गोडबोले अशी शेकडो नावे डोळ्यासमोर उभी राहत आहेत. नव्या पिढीचा जर विचार केला तर प्रशांत शहाणे, विजय काटवटे, सिद्धी पवार, संजय जोशी, जयवंत पवार, अनुराधा लिमये , प्रभावती जोशी , गोपाळ शेठ अशी अनेक नावे डोळ्यासमोर येत आहेत.
आज सध्या सातारा जिल्ह्यातील भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या चेहऱ्यांकडे पाहिले तर हीच का मूळ भाजप असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सत्ता आल्यानंतर जे सत्ताधारी पक्षात जातात ते कधीही निष्ठावंत नसतात तर तो एक समूह आहे. हा समूह सर्वच पक्षात विखुरला गेलेले आहे. त्याला भाजप अपवाद नाही. पूर्वी भाजपचा कारभार हा सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी चालत होता. आता नवीन भाजप कार्यालय सातारा शहराच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गापर्यंत गेलेला आहे. जणू काय आता जुनी भाजप सातारा शहरात राहिलेली नाही. असा संदेश द्यायचा आहे का? असा प्रश्न सातारा शहरात एकेकाळी संचलन करणाऱ्या करणाऱ्या व भाजपसाठी उघडपणाने हाफ पॅन्ट व हातात काठी घेऊन फिरणारे अनेकांना पडलेला आहे.
सत्ता नसतानाही भाजपचे विचार तळागाळात पोचवण्यासाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर, माधव भंडारी, गिरीश बापट यांच्या विचाराची शिदोरी आजही काही भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घर करून आहे. सध्या नव्याने भाजपमध्ये आलेल्या अनेकांना पूर्वीच्या राजकीय पक्षाची शिदोरी हीच खरी शिदोरी वाटत आहे. कारण, बालमनाचे संस्कार हे कधीही जात नाही. हे सुद्धा खरे आहे. केंद्रात नरेंद्र.. राज्यात देवेंद्र पण सातारा जिल्ह्यात गजेंद्र विचाराचे वारसदार निर्माण होणे. ही खऱ्या अर्थाने भाजपच्या सुदृढ बाळसं धारण केल्याची सुरुवात होणार आहे. याची आठवण करून द्यावी असं भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळेच भाजपचे अदृश्य शक्ती समोर आलेली आहे. भूमिपूजन निमित्त भाजपच्या सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. शेवटी परिवर्तन संसार का नियम आहे पण हा नियम लागू करताना जुन्यांचा विसर पडू नये. हे कायम मनात कोरले पाहिजे. अन्यथा एक जमाना था…. असं म्हणण्याची वेळ येणार आहे.
……… ……………………….
चौकट आज सब कुछ भाजप मे दिसत असले तरी एकेकाळी राजकीय पक्ष म्हणून अस्पृश्यता अनुभव घेणाऱ्या आज भाजपचेच मूळ कार्यकर्ते दूर ढकलले जात आहे याची नोंद व्हावी हीच अपेक्षा आहे.
————————&&&————
फोटो भाजप सातारा जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन प्रसंगी कमळ खाली पडले ते उचलून ठेवताना जुना कार्यकर्ता
केंद्रात नरेंद्र.. राज्यात देवेंद्र.. पण साताऱ्यात दिसेना गजेंद्र …
RELATED ARTICLES