मुंबई- प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट केला जाणार आहे.या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.यामध्ये भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ गणेश चतुर्थीच्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी करावा,यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सिद्धिविनायक मंदिराचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.या बैठकीला पालकमंत्री दीपक केसरकर, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,माजी खासदार राहुल शेवाळे,मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त सचिव डॉ. इक्बाल सिंह चहल आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते. यावेळी सदा सरवणकर यांनी सांगितले की,सिद्धिविनायक मंदिराचे सुशोभीकरण करताना भक्तांसाठी पार्किंग व्यवस्था,आसन व्यवस्था,फूल विक्रेत्यांसाठी सुसज्ज स्टॉल,मंदिर परिसरात पाच किमीचे कॉरिडॉर ,सीसीटीव्ही कॅमेरे आणि अन्य सोयीसुविधा केल्या जाणार आहेत.