Sunday, December 15, 2024
घरमनोरंजनप्राजक्ता माळी हिने वाढदिवसादिवशी केली घोषणा; लवकरच 'फुलवंती' चित्रपट येणार भेटीला

प्राजक्ता माळी हिने वाढदिवसादिवशी केली घोषणा; लवकरच ‘फुलवंती’ चित्रपट येणार भेटीला

प्रतिनिधी : मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फुलवंती’ या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी ‘फुलवंती’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी ‘फुलवंती’च्या भूमिकेत झळकणार आहे. स्नेहल तरडे एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या परिचयाच्या असून ‘फुलवंती’च्या निमित्ताने त्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली ‘फुलवंती’ दिमाखत बसलेली दिसत आहे.पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. रसिकप्रेक्षकांसाठी सांगितीक नजराणा असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल. “पद्मविभूषण स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरे” यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारीत आहे.

‘फुलवंती’ या सिनेमाबाबत प्राजक्ताने आपली प्रथम प्रतिक्रिया दिली. ” या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले याबद्दल देवाचे अनेकानेक आभार. ‘फुलवंती’ माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य ‘फुलवंती’ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. ‘फुलवंती’ आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल.”असे प्राजक्ता माळीने सांगितले.

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार ॲन्ड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रॉडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी, सहनिर्माते आहेत तर विक्रम धाकतोडे सहाय्यक निर्माते आहेत या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले असून; प्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश – विश्वजीत यांनी सांभाळली आहे. ‘फुलवंती’च्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली असून; वितरणाची धुराही पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments