सातारा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोठी हद्द वाढ झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यातील खड्डे सुद्धा मोठे झालेले आहेत. यावर कडक कारवाई करण्यापेक्षा बोटचेपीचे धोरण म्हणून नऊ ठेकेदारांना नोटीस पाठवली. सदरच्या सातारा नगरपालिकेच्या नोटीसाला काही ठेकेदारांनी चक्क खड्डा दाखवला आहे.काही ठेकेदारांनीच नैतिक जबाबदारी झटकल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झालेले आहे.
सातारा शहराचा फार मोठा विस्तार झालेले आहे. पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे तसेच सज्जनगड परळी भागातील बोगद्याच्या पलीकडे सातारा शहराची मोठ्या प्रमाणात हद्द वाढ झालेली आहे. करापोटी सातारा नगरपालिकेच्या तिजोरीत मुसळधार निधी पडत आहे. पण, विकासाचा दुष्काळ सुद्धा करदात्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
तसं पाहिलं तर सातारा शहरांमध्ये तीन मुख्य रस्ते आहेत. वरचा रस्ता मधला रस्ता आणि राधिका रोड असे त्याचे नामकरण झाले आहे. दोन रस्ते मतदार राजांसाठी आणि एक रस्ता ग्रामीण भागातून येणाऱ्या तालुक्यातील जनतेसाठी असे विनोदाने बोलले जाते. पण या तिन्ही रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यामुळे काही वाहन चालकांना झक मारली आणि साताऱ्यात आलो .असे म्हणण्याची पाळी आलेले आहे.
त्या मानाने सातारा जिल्ह्यातील कराड वगळता ग्रामीण भागाचा जर विकास पाहिला तर नमूद न केलेले बरे. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देशामध्ये रोल मॉडेल म्हणून सातारा कडे पाहिले जाते. हे कुणालाही मान्य करावे लागेल. सातारा शहरातील भूविकास बँक ते जुना आरटीओ रस्ता खरं म्हणजे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासारखी जागा आहे. मोटो क्रॉस च्या शर्यती घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही जागा आहे. पण, या जागेचा वाहन चालक का वापर करतात? याचे कधीही कोडे सुटलेले नाही. सातारा जिल्ह्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते यांनी काल सकाळी बोगदा परिसरात रास्ता रोको केला. त्याच वेळी शिवसेनेचे निष्ठावंत व कर्तबगार नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेऊन स्वातंत्र्य दिनी दिनांक १५ ऑगस्ट पर्यंत म्हणजेच दीड आठवड्यात संपूर्ण सातारच्या जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त करावेत असा फतवा काढलेला आहे. त्याच गतीने काही ठेकेदाराने हा फतवा खड्ड्यात गेला तरी चालेल. असे सांगून त्याकडे दुर्लक्ष केल्याची खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे.
विकास कामांची टक्केवारी वाढली . पण गुणवत्तेची टक्केवारी तशीच राहिलेली आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता दिसून येत नाही. जब साथ हो भैय्या …तो ऐसा ही वह्या.. कारण, प्रत्येक लोकप्रतिनिधींकडे विकास कामे वाटप नियंत्रण समितीचे अध्यक्ष पद खाजगी म्होरक्या पी.ए, काका, मामा, तात्या व भैय्या, नागनाथ, सोमनाथ अशा विशाल मनाच्या जवळच्या सहकाऱ्यांकडे आहे . त्यामुळे मर्जीतील ठेकेदार सुद्धा बिनधास्त झालेले आहेत. हेच जवळचे सहकारी काही देयकाची भागवाभागवी करत असल्याने त्यांच्या इशाराकडे सर्वांचे लक्ष असते.
प्रामाणिकपणाने काम करणारे सुशिक्षित बेरोजगार हे गुणवत्ता धारक ठेकेदार असून सुद्धा त्यांना कामे मिळत नाहीत. कारण, भैय्या लोकांना टक्केवारी देण्यामध्ये ते कमी पडतात. सुशिक्षित बेरोजगार यांना अभियंता परीक्षा पास होण्यासाठी चांगली गुण मिळालेले आहेत. पण काही लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील भैय्याला टक्केवारी देण्यात ते कमी पडतात. त्यामुळेच निकृष्ट दर्जाच्या कामाचा रिझल्ट हा खड्ड्यातून दिसून येतो. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यामध्ये अनेक नावलौकिक प्राप्त ठेकेदार आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीने कामे करून जनतेचे आशीर्वाद घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांची उंच भरारी नेत्र दीपक आहे हे नाकारून चालणार नाही. त्यांना साधी नोटीस सुद्धा पाठवण्याचे धाडस सातारा नगरपालिका करणार नाही. अशी त्यांची गुणवत्ता आहे. काही लोकप्रतिथीच्या जवळचे म्हणजे ठेकेदार झाले पाहिजे. असा समज आहे. अशा कार्यकर्ता कम ठेकेदारांना नोटीसा पाठवून त्यांच्या सुधारणा करणे म्हणजे एखाद्या व्यसनी माणसाला वारकरी बनवण्याचा आग्रह करणे. असाच प्रकार आहे. सध्या श्रावण महिन्यामध्ये पावसाच्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी आत्मचिंतन करावे. वरिष्ठ लोकप्रतिनिधींना ठेकेदारांसाठी सूचना देणे व अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्याची वेळ का आली? याचा हिशोब नक्कीच त्यांना नियती मागेल . हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तूर्त तीन महिन्याने होणाऱ्या निवडणुकीकडे नजर ठेवूनच कारभार करणे हिताचे नाही हे मतदारांनी सुद्धा ओळखावे.
साताऱ्यातील नगरपालिकेच्या नोटीसला दाखवला काही ठेकेदारांनी खड्डा…..
RELATED ARTICLES