प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार जोमाने प्रचाराला लागले आहेत. प्रचारासाठी उमेदवारांना दिवस रात्र कमी पडत आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारासाठी नवनवीन फंडे शोधत आहेत. शिर्डी लोकसभेचे महायुतीची उमेदवार सदाशिव लोखंडे संगमनेर तालुका दौऱ्यावर आहे. संगमनेरला गेल्यावर प्रसिद्ध अन्सार चाचा यांच्या वडापावच्या दुकानात वडा खान्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. यावेळी चाचांनी नेहमीच्या आपल्या शैलीने त्यांचे स्वागत केले. त्यांचा प्रसिद्ध डॉयलॉग “खाता की नेता” हा वापरला. तसेच आमच्याकडे वडा खाणारा निवडूनच येणार? अशा अनोख्या शुभेच्छाही दिल्या.
अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात आणि देशभरात आपल्या विशिष्ठ शैलीने अन्सार चाचा प्रसिद्ध आहे. ग्राहकांशी प्रेमाने बोलण्याबरोबर अतिशय चविष्ट वडापावसाठी त्यांचे समनापूर ओळखले जाते. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अन्सार चाचा यांच्या नशीब वडापाव येथे भेट दिली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांना वडापाव खाण्याचा मोह आवरला नाही. खासदारांचा ताफा अचानक अन्सार चाचांच्या दुकानासमोर थांबताच अन्सार चाचांनी देखील दुकानातून बाहेर येत खा.लोखंडे यांचे स्वागत केले.
चाचा म्हणाले, “खाता की नेता”
खासदार लोखंडे यांनी अन्सार चाचांचा हात हातात घेत त्यांचा फेमस डायलॉग ..”खाता की नेता” म्हणताच उपस्थितांसह अन्सार चाचा देखील खळखळून हसले. ते उत्तरात म्हणाले… “पहिले खाता अन् मग नेता” नेत्या समोर खाता आणि नेता असे यमक योगायोगाने जुळल्याने अन्सार चाचांना हसू आवरले नाही. त्यानंतर चाचांनी सदाशिव लोखंडे यांच्या सह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. चाचांनी स्वतः आपल्या हाताने खासदारांना वडापाव देखील खाऊ घातला.