पॅरिस (क्रीडा प्रतिनिधी) : विजय आणि विजगीषु वृत्ती यातील फरक काय तर ‘वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागणे म्हणजे विजिगीषु वृत्ती’… व. पू. काळेंनी लिहीलेली ही वपुर्झा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या लक्ष्यसेनच्या ब्राँझ मेडलच्या मॅचमध्ये अनुभवायस मिळाली. मलेशियाच्या लि झियाविरुद्ध लक्ष्यसेनने पहिला गेम 21-13 असा जिंकलेला. दुसऱ्या गेममध्ये ६-५ अशी आघाडी घेतलेली. ब्राँझ मेडलपासून फक्त १५ गुण दूर. आणि उजव्या हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीने उचल खाल्ली. रक्त ओघळायला लागले. बॅडमिंटनच्या कोर्टवर वारंवार लक्ष्यसेनच्या मनगटातून ठिबकणारे रक्त पुसावे लागत होते. प्रतिस्पर्धी लि झियाने लक्ष्यसेनची दुखती रग हेरली. रक्ताची चटक लागलेल्या वाघासारका ली झिया हा लक्ष्य सेनवर तुटून पडला. आणि जेव्हा मॅच संपली तेव्हा स्कोअर बोर्ड १३-२१, २१-१६, २१-११ असा लक्ष्य सेनच्या पराभवाची दास्तान सांगत होता.
आपल्या पहिल्याच मॅचमध्ये लक्ष्यसेनने ऑलिम्पिकची सेमी फायनल गाठली होती. ऑलिम्पिकच्या इतिहासात सेमी फायनलला पोहचणारा तो पहिला भारतीय ठरला होता. या एतिहासिक कामगिरीनंतर खरं तर त्याच्याकडून गोल्ड मेडलचीच अपेक्षा तमाम भारतीय बाळगून होते. त्याला कारणही तसेच होते. आजवर जितकी विजेतेपद लक्ष्यने जिंकली आहेत ती पहिल्याच प्रयत्नात. २०२२ साली वर्ल्ड चॅम्पियन लोह कीन युवचा पराभव करीत त्याने इंडियन ओपन जिंकली. त्याचवर्षी पदार्पणात कॉमनवेल्थचे गोल्ड मेडल जिंकले. त्याआधी २०२१ साली पदार्पणात वर्ल्ड चॅम्पियन्सशिपमध्ये ब्राँझ मेडल जिंकले होते. त्याचा हा धडाका पाहून २०२१ साली टोकीय ऑलिम्पिकचा गोल्ड मेडेलिस्ट व्हिक्टर एक्झेसेनने त्याला दुबईतील त्याच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सरावाचा पार्टनरम्हणून निमंत्रित केले होते. आणि हे सर्व वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याने साध्य केले आहे. आणि योगायोग पहा याच व्हिक्टरने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमच्या सेमीफायनलमध्ये त्याचा पराभव केला. व्हिक्टरला २०२१लाचा लक्ष्यसेनची चुणक कळळी होती हेच खरे. या पराभवामुळे आज तो ब्राँझ मेडलची मॅच खेळत होता. मॅच जवळपास त्याने जिंकलीच होती. बॅडमिंटन कोर्टवर जीतेगा भाई जितेगा इंडिया जितेगाचा नारा बुलंद झाला होता. सारं काही मनासारके होत असताना डाव फसला. हाती पराभव आला. लक्ष्यसेनने बॅडमिंटन कोर्टवर घाम आणि रक्तही गाळले पण विजयासाठी तेही पुरेसे नव्हते. तमाम भारतीय पाठीराख्यांच्या आणि आम्हा पॅरिसमध्ये दाखल पत्रकारांच्या मनात प्रश्नतर खुप होते.
मॅच संपल्यानंतर तमाम भारतीय मिडिया पॅरीसच्या बॅडमिंटन कोर्टवर त्याची वाट पहात उभा होता. इतक्यात त्याचे कोच प्रकाश पदूकोन त्याच्याएवेजी कोर्टबाहेर आले. लक्ष्यला दुखापतीमुळे थोडा आराम करायचाय त्यामुळे मी त्याच्यावतीने येथे आलोय. असे त्यांनी सांगितले. आम्हा पत्रकारांनीही ते मान्य केले. व.पु काळेंच्याच शब्दात सांगायचे झाले तर आयुष्यात अशी एक वेळ असते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते… लक्ष्य सेनने ऑलिम्पिकची सेमीफायनल गाठून इतिहास तर घडविला आहे. आता गरज आहे ती लक्ष्यला आपल्या सगळ्यांच्या साथीची…