मुंबई/ प्रतिनिधी : भारतात दरवर्षी ३ ऑगस्ट या दिवशी अवयवदान दिन साजरा करण्यात येतो. तर १३ ऑगस्ट या दिवशी जागतिक अवयवदान दिन (World Organ Donation Day) साजरा करण्यात येतो. अवयवदानासंबंधी लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे जीवनविद्या मिशन मैदानात उतरले आहे. अवयवदान दिवसाचे औचित्य साधून
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (ZTCC )तसेच जीवनविद्या मिशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवयवदान अभियान संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात आली. तसेच इच्छुक अवयवदात्यांची नोंदणी करून घेण्यात आली.
माजी खासदार श्री. संजीव नाईक, सौ कल्पना नाईक आणि कु. संकल्प नाईक हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त सचिव श्री. दीपक काळे, अवयवदान अभियान समिती प्रमुख श्री. प्रमोद रासम, विश्वस्त श्री. मुल्यमवार, श्री. प्रभाकर उंडे हेही यावेळी उपस्थित होते.
जीवनविद्या मिशन नवी मुंबई १, नवी मुंबई २ व नेरुळ या तीन ज्ञानसाधना केंद्रांचे पदाधिकारी, पनवेल ते ऐरोली या विभागातील सक्रिय कार्यकर्ते, महिला, युवा व पुरुष मिळून ४०० पेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येऊन या मानवी साखळीत सहभाग घेतला होता.
युवा कार्यकर्त्यांनी जनजागृतीसाठी “अवयव दान श्रेष्ठ दान” या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. अनिता मोरे यांनी लिहिलेल्या या पथनाट्याचे दिग्दर्शन कोमल लेकावळे यांनी केले होते.
श्रीकांत घाग, डॉक्टर किर्ती हंपे, प्रसाद कदम, अभिजीत कोदे, विनायक करलकर, संदिप शिर्के यासह अनेक नामधारकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले.
तसेच स्वाती संदाशी आणि सुचिता कलगुटकर यांच्या नियोजनाने मंत्रालय परिसरात देखील अवयवदान अभियान स्टॉल लावून नोंदणी करण्यात आली. अवयव निकामी होणे हे जगभरातील लोकांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात अवयव प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. भारतात हजारो लोक अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाबाबत लोकांमध्ये अनास्था आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे.
शासनाच्या अवयवदान अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जीवन विद्या मिशन हे समाजोपयोगी कार्य गेली काही वर्ष करीत आहे. माणसाचे शरीर हे परमेश्वराची अद्भुत निर्मिती आहे.
अवयवदानाच्या माध्यमातून मृत्युपश्चात आपले मौल्यवान अवयवदान करण्याचा संकल्प करुन जीवनरक्षक आणि जीवन बदलणारा होण्याची संधी सर्वांना आहे.
अवयवदानासंबंधी गैरसमज दूर करण्यासाठी जीवनविद्या मिशन मैदानात ; वाशी रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात भव्य मानवी साखळीचे आयोजन
RELATED ARTICLES