मुंबई (रमेश औताडे) : अपंग हा शब्द बदलून दिव्यांग केला मात्र आमच्या कल्याणकारी योजना व मागण्या मात्र सरकारने अंमलबजावणीविनाच ठेवल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा आम्हाला भेट दिली होती. प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला आश्वासन देत संबंधित अधिकारी वर्गास आदेश दिले. मात्र सरकारी अधिकारी त्यांचेही ऐकत नाहीत. सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वजण लाडके, लाडकी होत असताना स्वाभिमानाने जगणारा दिव्यांग सरकारचा ” लाडका दिव्यांग ” कधी होणार ? असा सवाल राज्यातील दिव्यांग शिक्षकांनी केला आहे.

महाराष्ट्रातील ३५ जिल्यातील या २१८ शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठीचा प्रस्ताव अजूनही मंत्रिमंडळ बैठकीत आला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना आदेश देतात अधिकारी मात्र मागील पानावरून पुढे अशी कार्यवाही करतात. आत्तापर्यंत चार वेळा आंदोलन करावे लागले आता हे पाचवे आंदोलन आहे. आम्ही दिव्यांग जरी असलो तरी स्वाभिमानाने जगत आहोत. त्यामुळे सरकारने आता अंत पाहू नये. आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे प्रवीण बोंडे यांनी सांगितले.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग शिक्षकांनी मोठे काम केले आहे व अजून करत आहेत.२१८ शिक्षकापैकी १५७ शिक्षक शंभर टक्के अंध आहेत तर ६१ अस्थिव्यंग आहेत. आत्तापर्यंत चार आंदोलने. मात्र सरकारने आश्वासनापलीकडे अद्याप काहीच दिले नाही. आश्वासनावर उदारनिर्वाह होतो का ?असा सवाल प्रवीण बोंडे यांनी यावेळी केला.