मुंबई (रमेश औताडे) : मुस्लीम समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महाविकास आघाडी बरोबर सर्व ते प्रयत्न करून न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत २५ ऑगस्ट रोजी बांद्रा येथे राज्यव्यापी मुस्लिम विचार मंथन परिषद होत असल्याची माहिती माजी राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या १० वर्षात भारतीय जनता पार्टी प्रणीत मोदी सरकारने देशपातळीवर मुस्लीम आणि मागासवर्गीयांच्या विरोधात संविधान विरोधी कृती कार्यक्रम आखलेला होता. धार्मिक व जातिय तेढ निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करून मुस्लीम समाजाची प्रतिमा मलीन केली. देशामधील अल्पसंख्यांक समाजाची धर्म, भाषा, संस्कृती आणि इतिहास संपविण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने सातत्याने झाला. असे हुसेन दलवाई यांनी यावेळी सांगितले.
देशात २०१४ ते २०२४ पर्यंत मुस्लीम व दलितांचे १७७ झुंड बळीने खून करण्यात आले. गेल्या ३ महिन्यात साधारण ८-१० घटना झुंड बळीच्या झालेल्या आहेत. एकंदरीत या सर्व परिस्थितीचे आकलन व्यवस्थितपणे मुस्लीम समाजाला झाले. देशभरात इंडिया व महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीमागे लोकसभा निवडणुकीत धार्मिक गट, बिरादरी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांची एकत्रित मुठ बांधून प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडीला निवडून आणण्यामध्ये मुस्लिमांनी सिहांचा वाटा उचलला असे दलवाई म्हणाले.
देशात आणि राज्यात मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आहे. महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही आणि मुस्लीम विरहीत विधानपरिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आणली, याच्या तीव्र वेदना मुस्लिम समाजाला आहेत. राज्यात किमान ३५ मतदार संघ मुस्लीम बहुल असून त्याठिकाणी मुस्लीम उमेदवार दिल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठींब्यावर मुस्लीम उमेदवार निवडून येवू शकतात. त्यापैकी किमान २५ तरी विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीने विभागून घेवून मुस्लीम समाजाला
द्याव्यात अशी मागणी दलवाई यांनी यावेळी केली.