सातारा(अजित जगताप) : अशी ही साताऱ्याची तऱ्हा असे म्हणण्याची पाळी अनेकांवर आली आहे .सातारा शहरातील बसस्थानका मागील पारंगे चौकात एका रिक्षावाल्याच्या कटमुळे क्लास वाल्या व्यक्तीला दुचाकीसह नाल्यात पडण्याचा प्रकार घडला. यामुळे काही रिक्षाचालकांची अरेरावी व मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरांमध्ये रिक्षांचे प्रमाण वाढलेले आहे. तीन ऐवजी सहा प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही रिक्षा चालकांसाठी असणारा बिल्ला व गणवेश न घालणे. एवढेच नव्हे तर काही रिक्षा चालक चक्क दारू पिऊन रिक्षा चालवत असल्याची बाब सर्वांनाच माहित आहे. अशाच एका रिक्षाचालकाच्या घाईगडबडीने श्रावणी सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता सातारा शहरातील पारंगे चौकात दुचाकी चालकाला कट मारल्यामुळे बिचार्या क्लास वाल्या एका व्यक्तीला शेजारील नाल्यात दुचाकीसह जीव वाचवण्यासाठी पडावे लागले.
या वेळेला राष्ट्रवादी भवन मध्ये आ. शशिकांत शिंदे यांच्या जनता दरबार निमित्त आलेल्या कोरेगाव तालुक्यातील विनोद भोसले, बिपिन मोरे व शिवसेना (उबाठा )गटाचे गणेश अहिवळे, युवराज पाटील, विकी निंबाळकर यांनी माणुसकी भावनेतून मदत करून त्या क्लास वाल्यांना रस्त्याच्या शेजारील नाल्यातून सुखरूप बाहेर काढले. बिचाऱ्याची कोणती चूक नसताना रिक्षाचालकाच्या अतीघाई गडबडीमुळे जीव वाचवण्यासाठी नाल्याचा आश्रय घ्यावा लागला. याच नाल्यात त्यांच्या काही वस्तू पडल्या . त्या गोळा करण्यासाठी बिचार्याची धडपड सुरू होती. सदरचा प्रसंग जर त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. असेल तर निश्चितच दिसून येईल .त्या आधारे संबंधित रिक्षाचालकावर कारवाई होऊ शकते. हा प्रसंग दुपारी पावणे दोन वाजता घडला त्यावेळेला सातारा वाहतूक शाखेची एक वाहन त्या ठिकाणी होऊन निघाले होते असे प्रथमदर्शनीने जमलेल्या लोकांना सांगितले.
