Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशअपुर्णतेतील पुर्णता !            संदीप चव्हाण

अपुर्णतेतील पुर्णता !            संदीप चव्हाण

सर डॉन ब्रॅडमन, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि पॅरिसची परी मनू भाकर यांच्यात एक साम्य आहे. तिघांनीही आपल्या कौशल्याने खेळात इतिहास घडविला. नवनवे विक्रम रचले. आणि या तिघांच्या आयुष्याच्या एका वळणावर सगळे जग जिंकल्यांनंतरही एक अपुर्णता कायम हृदयात सलत राहीली. अर्थात त्या अपुर्णतेनेही या तिघांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून दिलाय.

पॅरिसपासून अडीचशे किलोमीटर दूर शातरू शुटींग रेंजवर मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन मेडल जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याच्या अवघ्या समीप होती. स्पर्धेतील शेवटच्या पाच मिनिटात ती अक्षरशा रौप्यपदाकाला स्पर्श करून आली. पण एक नेम चुकला आणि आयुष्यभराची एक सल पदरी पडली. तो नेम जर अचूक लागला असता तर तीचे पॅरिस ऑलिम्पिकमधिल पदक नक्की होते. तो शेवटचा नेम चुकला आणि चौथ्यानंबरवरील हंगेरीच्या व्हेरोनिकासोबत गुण बरोबरीत झाल्यामुळे शुटआऊट करावे लागले. तिथेही तीला पराभव पत्करावा लागला. आणि चौथ्या क्रमांकावर तीला समाधान मानावे लागले. शुटआऊटचा शेवटचा नेम साधल्यानंतर तीच्या चेहऱ्यावरची क्लांत भावमुद्रा आयुष्यात न विसरता येणारी. कर्म करीत रहा फळाची अपेक्षा धरू नका असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्जुनाच्य चेहऱ्यावर जे भाव असतील ते तिच्या चेहऱ्यावर मी अनुभवले. मेडल जिंकले तेव्हा विजयाचा उन्माद नव्हता आणि आज थोडक्यात पराभव हुकल्यानंतरही निराशा नव्हती. होता तो क्लांत भाव. मी माझ्यातील सर्वस्व दिल्याची भावना त्या मुद्रेत होती. श्रीकृष्णाची गीता एव्हाना मनूच्या आयुष्याची अविभाज्य भाग बनलीय. तिच्यातील प्रग्लभपणा थक्क करणारा आहे. याच मनुला जेव्हा मी टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भेटलो होतो तेव्हा ती अवखळ होती. अनेक चुका झाल्या. कोच जसपाल राणासोबत झालेला तीचा वाद त्यावेळी खुप गाजला होता. गेल्या चार वर्षात ‘गीते’ने तीचे आयुष्य पुर्णत: पालटून टाकले. जसपाल राणा पुन्हा तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीला. आणि अवघ्या भारताला ऑलिम्पिक चॅम्पियन मनू मिळाली. आजवर ऑलम्पिकच्या शुटींगमध्ये भारताच्या महिलांना मेडल मिळाले नव्हते. यंदा मनूने एकाच ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन मेडल मिळवलेत. यापुर्वी कुस्तीमध्ये सुशील कुमार आणि बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधू यांनी प्रत्येकी दोन ऑलिम्पिक मेडल जिंकली होती. पण एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकणारी मनू ही पहीलीच.

वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्रॅडमन, सचिन आणि मनु यांच्यात अजून एक साम्य होते ते म्हणजे अपुर्णतेनंतरही त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले नाही. सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या शेवटच्या टेस्टमध्य शंभर रन्सची सरासरी गाठण्यासाठी फक्त चार रन्सची गरज होती. क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या आणि आयुष्यात तब्बल ६८१ चौकार ठोकणाऱ्या ब्रॅडमन इंग्लडविरुध्दच्या त्या टेस्टमध्य दुसऱ्याच बॉलवर बोल्ड झाले होते. इंग्लंडच्या एरिक होलिसने गुगलीवर या महान बॅटसमनला बोल्ड घेतला.

हेच सचिनच्या बाबतीत. सेंच्युरीची सेंच्युरी मारणाऱ्या सचिनला अखेर वन डेत ४९ सेंच्युरीवरच समाधान मानावे लागले. कसोटीत ५१ शतके ठोकून सचिनने सेंच्युरीची हाफ सेंच्युरी मारली, पण वन डेमध्ये त्याला हे काही जमले नाही. पण बोल्ड झाल्यावर ब्रॅडमन, शेवटची मॅच खेळल्यावर सचिन आणि तिसरे ऑलिम्पिक मेडल हुकल्यावर मनु यांच्या चेहऱ्यावरील ते समाधानाचे हास्य तपस्येशिवाय शक्यच नाही. अपुर्णतेलाही पुर्णतेचे वलय देण्याची ताकद त्या समाधानी हास्यात होती. त्यांच्या त्या तपस्येला सलाम…

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments