कोल्हापूरी मातीची बातच न्यारी आहे. ‘सुजल्याशिवाय कळत नाही की मारले कुठयं’ हा झाला कोल्हापूरी बाणा. खरंतर पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकाराची फायनल गाठताना स्वप्निलची कामगिरीही सातव्या क्रमांकाची होती. आजवरची त्याची सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरी होती ती इजिप्तच्या कैरोमधिल चौथ्या क्रमांकाची. त्यामुळे येथे भारतीय मीडियानेही स्वप्निलला तसे फारसे गांभिर्याने घेतले नाही. एकतर ऑलिम्पिकमधिल ही शुटींग रेंज पॅरिसपासून तब्बल २७२ किलोमीटर दूर आहे. मुंबईच्या भाषेत सांगायचे झाले तर ऑलिम्पिक मुंबईला असेल तर शुटींग साताऱ्याला. बरं तिथे जाण्यासाठी ऑलिम्पिक समितीकडून कुठलीही सोय नाही. आपल्या खर्चाने जायचे आणि यायचे. त्यामुळे हा प्राणायाम आणि स्वप्नीलचा क्वालिफाईंगमधिल सातवा क्रमांक, यामुळे निम्म्याहून अधिक भारतीय मिडिया पॅरिसमध्य तळ ठोकून होता. या सगळ्यांना स्वप्निलने कोल्हापूरी हिसका दाखविला आणि मग स्वप्निलची प्रतिक्रीया घेण्यासाठी अवघ्या पॅरिसमध्ये धावपळ उडाली. आम्ही काही मोजके पत्रकार सकाळी साडेतीनला घरातून निघून सव्वा आठला शुटींगच्या रेंजवर इतिहास घडण्याची वाट पहात होतो. आणि तो क्षण जवळ आला. स्वप्निलने चक्क ब्राँझ मेडलला गवसणी घातली आणि कोल्हापूरी जगात भारी असल्याचे दाखवून दिले. जगातील सर्वोत्तम खेळाडू त्याच्यापुढे होते. अशावेळी त्याने अविश्वसनीय पद्धतीने आपली कामगिरी उंचावत नेली. इतकी की एकवेळ अशी आली की फक्त सहा फैरी शिल्लक असताना तो दुसऱ्या क्रमांकावर होता. एक शॉट थोडासा खराब झाला आणि त्याची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. खरं तर त्या खराब शॉटनंतर कुठल्याही खेळाडूने हाय खाल्ली असती. पण स्वप्नील ठरला कोल्हापूरी. त्याने त्या एका खराब शॉटनंतर प्रत्येक शॉटगणिक आपली कामगिरी उंचावली. आणि भारताला एतिहासिक ब्राँझ मेडल जिंकून दिले. वैयक्तीक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांच्यानंतरचे हे अवघे दुसरे मेडल आहे. खाशाबांनी
