प्रतिनिधी :पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडची दुर्दशा आणि रेंगाळलेले विस्तारीकरण यावरून आज काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. महामार्गाची वाईट अवस्था असताना टोल का द्यायचा, असा प्रश्न राज्य सरकारला विचारात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारले. पुणे, सातारा, कराड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील आंदोलनात बड्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे काँग्रेसने आंदोलन केले. राज्य सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही, तो पर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती. त्यांनी खर्डा आणि भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडला होता. आंदोलनावेळी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना टोल न भरता पुढे पाठवले जात होते. काँग्रेस कार्यकर्ते वाहनांवर टोल भरणार नाही असे स्टिकर लावत होते. या आंदोलनात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राहुल पाटील, शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर ठिय्या मांडला होता. आंदोलनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील म्हणाले की, या महामार्गाचे काम सुरू असले तरी सर्व्हिस रोड अत्यंत खराब आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज पुण्यातून कोल्हापूरला येण्यासाठी सात ते आठ तास लागतात. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णाला न्यायचे झाल्यास वेळेवर नेता येत नाही. महामार्गाची दुर्दशा असतानाही टोल वसूल केला जात आहे. जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत. तोपर्यंत टोल वसुली थांबवा.
कोल्हापूर प्रमाणे सातारा, कराड आणि पुण्यातही काँग्रेसचे आंदोलन सुरु होते. सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आणेवाडी व तासवडे टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार विश्वजीत कदम सहभागही झाले होते. तसेच पुणे बंगळूर महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर देखील काँग्रेसने आंदोलन केले. टोल नाक्यावर भरमसाठ टोल वसूल केला जातो. मात्र टोलच्या बदल्यात वाहनचालकांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचे म्हणत भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप रस्त्यावर उतरले होते.