मुंबई(रमेश औताडे) : उच्च दर्जा आणि आकर्षक आशय आपल्या चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूरदर्शन नेहमीच अग्रेसर आहे. सामाजिक संदेश देत दूरदर्शन नेहमीच आघाडीवर आहे. त्यात भर म्हणून चार नवीन कार्यक्रम ऑगस्ट च्या पहिल्या पंधरवड्यापासून सह्याद्री आणि डीडी नॅशनल या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणार आहेत. अशी माहिती दूरदर्शन सह्याद्री वाहिनी कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
मागील वर्षभरात सूद यांनी ज्येष्ठ लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांच्यावरील माहितीपटाची २८ भागांची मालिका, ग्राहक जागृतीचे सर्वोत्तम उदाहरण ठरलेला जागो ग्राहक हा कार्यक्रम आणि प्रसिद्ध मराठी गीतकार आणि संगीतकारांचा सहभाग असलेला गोष्टी गाण्याच्या हा कार्यक्रम असे अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणले. आता ८ आणि ९ ऑगस्ट रोजी, जेष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचा सहभाग असलेला, गोष्टी गाण्याच्या या कार्यक्रमाचा ९० आणि ९१ वा भाग प्रसारित होणार आहे.
” आमची अनन्या ” या मालिकेत प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि परंपरेची झलक पाहायला मिळेल, विनोद आणि हृदयस्पर्शी क्षणांचे मिश्रण पाहायला मिळेल. तर ” आमचे हे आमची ही ” या कार्यक्रमात महाराष्ट्रातली सेलिब्रिटी दांपत्ये यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर करणार आहेत.
” वाचू आनंदे ” हा अनोखा चर्चात्मक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात मान्यवर लेखक आणि सुप्रसिद्ध व्यक्ती गाजलेल्या साहित्य कृतींमधील उताऱ्यांचे वाचन करतील. ” हम तो मिडल क्लास है ” आनंददायक विनोदी मालिका असून त्यात मध्यमवर्गीय कुटुंबातील रोजच्या जगण्यातील आनंद आणि संघर्ष यांचे दर्शन घडते.
यावेळी वामन केंद्रे, सावनी रवींद्र, पृथ्वी काळे, इरावती लागू, नंदू गाडगीळ आणि अनुज कपूर यांच्यासह मान्यवर कलाकार यावेळी उपस्थित होते