मुंबई (रमेश औताडे) : धर्मादाय (चॅरिटी) संस्थेचे सर्व फायदे घेणाऱ्या हॉस्पिटलला मिळालेली जमीन ही कवडीमोल दराने चॅरिटी करण्याच्या हेतूने दिलेली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना नियमाप्रमाणे सवलतीच्या दरात सेवा देणे बंधनकारक आहे. नवी मुंबईतील सर्व हॉस्पिटल धर्मादाय संस्थेचे नियम काटेकोरपणे पाळतात की नाही? याचे ऑडिट करावे. अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी नवी मुंबई महनगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांना निवेदन देऊन दिला आहे.

नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटल मध्ये नरेंद्र गाडे यांच्या पत्नीचे बाळंतपण झाले होते. गाडे यांचा पत्नीला अनेक वर्षांनंतर जुळी मुले झाली. मुले होण्याचा आनंद व गाडे यांची आत्महत्या तसेच महत्वाचे म्हणजे हॉस्पिटलचे थकीत बिल या सर्व प्रकरणाचा तेरणा हॉस्पिटल प्रशासनाशी काही संबंध आहे का ? असा सवाल करत मनसे आक्रमक होत जन आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
धर्मादाय हॉस्पिटलच्या राखीव बेड बाबत माहिती सगळ्या हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावी. तसेच विविध उपचार, शस्त्रक्रिया यांचे दरपत्रक महानगरपालिकेने ठरवावे व ते हॉस्पिटलच्या दर्शनी भागात मराठीत लावावे. अशी मागणी सुद्धा मनसेने केली आहे. पालिकेने यावर तात्काळ ठोस उपाय योजना केल्या नाहीत तर मनसे जन आंदोलन करणार असा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला आहे .
निवेदन देताना मनसेच्या शिष्टमंडळात पालिका कामगार सेना शहर संघटक आप्पासाहेब कौठुळे, अनिकेत भोपी, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, निखिल गावडे, मंगेश पाटील, अतिश पाटील, गणेश पाटील, विष्णू कांबळे, मयंक घोरपडे, विष्णू कांबळे, अविनाश फाळके, संदेश पेडणेकर, जालिंदर चव्हाण उपस्थित होते.