
मुंबई : प्रवासी हा एसटीचा मुख्य घटक आहे. त्याचे ” अंतिम समाधान ” हेच एसटीचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे! त्यामुळे त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. याबरोबरच या संस्थेमध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा आपल्या कामाबाबतीत संतुष्ट असला पाहिजे! त्याच्या कामाच्या वेळी त्याला मानसिक समाधान लाभले पाहिजे! यासाठी त्याच्या दैनंदिन कर्तव्याच्या आड येणाऱ्या समस्या, त्यांच्या तक्रारीचे निर्मूलन देखील स्थानिक पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. हे हेतू समोर ठेवून एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी ” प्रवासी राजा दिन ” व “कामगार पालक दिन” साजरा करण्याची संकल्पना मांडली.या दोन्ही उपक्रमांना गेल्या पंधरा दिवसांमध्ये उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
१५ जुलै पासून प्रत्येक आगारात आठवड्याच्या दर सोमवारी व शुक्रवार हे उपक्रम साजरे करण्यात येतात. जुलै महिन्यात २५१ पैकी १५१ आगारात उपरोक्त उपक्रम साजरे करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या ७०६ तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यापैकी ३१९ तक्रारींचे तातडीने निर्मूलन झाले असून, ३८७ तक्रारींचे निर्मूलन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याबरोबरच कामगारांच्या ९६२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ३०३ तक्रारींचे निर्मूलन झाले असून, ६५९ तक्रारींचे निर्मूलन करण्याची कार्यवाही सुरू आहे. या उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल अनेक प्रवाशांनी व कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासनाला धन्यवाद दिले असून अशा उपक्रमातून प्रवाशांचा एसटी वरील विश्वास व कर्मचाऱ्यांची आपल्या वरिष्ठ अधिकांऱ्यावरील निष्ठा वृद्धिंगत होण्यास मदत होते असे मत व्यक्त केले आहे.