माणसाच्या अंगी सर्वगुणसंपन्न अशी कला असली की या कलेला वाव मिळतो. जशा पद्धतीने आपण जमिनीमध्ये बियाणे पेरतो आणि जमीन बाजूला करून त्याला अंकुर फुटतो. कालांतराने त्याचा मोठा वटवृक्ष होतो. तशा पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कला व साहित्य क्षेत्रात खऱ्या अर्थाने कोहिनूर हिरा म्हणून आपले नाव अजरामर केलेले आहे. आज त्यांच्या १०४ व्या जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सब कुछ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे… असेच वातावरण पाहायला मिळाले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १८ जुलैला स्मृतिदिन तर एक ऑगस्ट जयंती दिन आहे .तसं पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गरिबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. संघर्ष तुझे नाव अण्णाभाऊ साठे असे जीवन ते जगले होते. त्यांनी कधीही लाचारी पत्करली नाही. राजकीय पटलावर डाव्या विचारांचा प्रभाव त्यांनी मरेपर्यंत जपला.
त्यांच्या साहित्याबद्दल जर बोलायचं झाले तर त्यांच्या लेखणीतून साक्षात शब्दालाही अंकुर फुटत होता. एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी केलेले विश्लेषण म्हणजे त्यांच्या कथेतील नायकाचे रूपच दाखवून दिले आहे. कादंबरीतून नायकाची नजर कधी भुई सोडत नव्हती. याचा अर्थ बाया बापड्यांकडे नजर वर करून ते बोलत नव्हते. एका शब्दात त्यांनी चारित्र्यसंपन्न नायक उभा केला. आज माझ्यासारखे अनेक जण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चाहते व भक्त आहेत.
जग बदलून गेले घाव सांगून गेले आम्हा भीमराव अशा शब्दात त्यांनी महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महंती सर्व समाजाला तसेच दलित, शोषित, कष्टकऱ्यांना सांगितले आहे. अण्णाभाऊ साठे यांना फक्त दहा वर्षे मिळाले असती तर खऱ्या अर्थाने भारतरत्न नव्हे तर नोबेल पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला असता. पण, काही गोष्टी अल्पजीवी असल्या तरी त्या अमर असतात. त्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे अमर झालेले आहेत.
त्यांच्या जयंतीनिमित्त आज अनेक विधायक उपक्रम राबवले जात आहेत.
अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. आदरणीय लक्ष्मण ढोबळे सर, प्रा. शरद गायकवाड, प्रा. सुकुमार कांबळे, प्रा. मच्छिंद्र सकटे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश बोतालजी एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील आनंदा साठे ,तानाजी वायदंडे, सोमनाथ साठे, शिवाजीराव खुडे, रवींद्र पवार, सोमनाथ पाटोळे, सत्यवान कमाने, अरुण भिसे अशा अनेक मंडळींनी त्यांचा आदर्श घेतलेला आहे.
त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे निधन १८ जुलै १९६९ रोजी घाटकोपर येथील चिराग नगर मध्ये निधन झाले.
निखारा, नवती, फरारी, पिसाळलेला माणूस, जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडा, गजाआड, बरबाद्या कंजारी , चिरानगरची भुतं , कृष्णाकाठच्या कथा हे कथासंग्रह व
कादंबऱ्या –
चित्रा , फकिरा , वारणेचा वाघ , चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता, रत्ना, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, आवडी, वैर, पाझर या कादंबऱ्या जगभर पोहोचलेले आहेत.
अकलेची गोष्ट , देशभक्त घोटाळे , शेटजींचे इलेक्शन , बेकायदेशीर , पुढारी मिळाला , लोकमंत्र्यांचा दौरा , माझी मुंबई, कापऱ्या चोर, मूक मिरवणूक हे लोकनाट्य व इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान नाटके त्या काळी खूप गाजली होती.
आज सातारा जिल्ह्यातील अनेक जण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ असलेल्या वाटेगाव जिल्हा सांगली इथून ज्योत आणत आहेत. ही साहित्याची ज्योत प्रत्येकाच्या देव्हार्यात तेवित ठेवली पाहिजे. आज खऱ्या अर्थाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला असता. हे मात्र खरे….. पुन्हा एकदा या माझ्या साहित्यक देवाला मानाचा मुजरा व जय भीम… जय अण्णाभाऊ….