आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आपला देह ठेवला. गिरगांव चौपाटीवर अरबी समुद्राला लाजवेल अशा विराट जनसागराने लोकमान्यांना साश्रू नयनाने, जड अंतःकरणाने निरोप दिला. लोकमान्यांना जाऊन आज एकशे चार वर्षे पूर्ण झाली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच, असे ब्रिटिशांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ठणकावून सांगितले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य/ स्वराज्य मिळाले. परंतु गेल्या पंचाहत्तर वर्षात आपण स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात करु शकलो आहोत कां ? हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजीराव सिलम यांचे नातू प्रकाश सिलम हे गेल्या अनेक वर्षांपासून गिरगांव चौपाटी येथे स्वराज्य भूमि हे नाव देण्यात यावे यासाठी जंग जंग पछाडताहेत. अर्ज विनंत्या केल्या, लोकशाही मार्गाने आंदोलने केली. लोकमान्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. २६ जानेवारी वा १ मे असो, २३ जुलै असो, १ ऑगस्ट असो, १५ ऑगस्ट असो, या प्रत्येक महत्त्वाच्या राष्ट्रीय दिनी प्रकाश सिलम हे आपल्या स्वराज्य भूमि ट्रस्ट तर्फे गिरगांव चौपाटीवर असलेल्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन तिथे न चुकता ध्वजारोहण करीत असतात. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना यासाठी पाचारण करीत असतात. चर्नी रोड रेल्वे स्थानकाला ‘स्वराज्य भूमि’ नांव देण्यासाठी आग्रही मागणी करीत आहेत. मंत्री येतात, जातात. आश्वासने देतात परंतु कागदी घोडे नाचविण्याशिवाय हाती निष्पन्न काहीच नाही. आता राज्य सरकारने चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे ‘गिरगांव’ नामांतर करण्याचा ठराव केला. म्हणजे ‘स्वराज्य भूमि’ ही मागणी बारगळली, असे समजायचे काय? प्रकाश सिलम हे आज ऐंशीच्या घरात आहेत, अजूनही ते धावपळ करताहेत. शिवसेना नेते अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई चे खासदार आहेत. ते बरेच प्रयत्न करतांना जाणवते. आजच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रकाश सिलम यांनी हाती घेतलेले कार्य तडीस जावे, ‘स्वराज्य भूमि’ व्हावी आणि स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात व्हावे, ही मनापासूनची अपेक्षा. -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).
स्वराज्य मिळाले पण सुराज्य आणि ‘स्वराज्य भूमि’चे काय ? -योगेश वसंत त्रिवेदी
RELATED ARTICLES