प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पुन्हा एकदा नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लाईफलाईन’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार असून ही चुरस रंगणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यामध्ये. त्यामुळे अशा दिग्गजांना एकत्र पाहाण्यासाठी प्रेषक खूपच उत्सुक आहेत. त्यातच आता या चित्रपटातील ‘होत्याचं नव्हतं झालं’ हे मनाच्या खोलवर जाणारे गाणेही प्रदर्शित झाले आहे.
‘होत्याचं नव्हतं झालं’ हे गाणं सिने रसिकांच्या पसंतीला उतरत आहे. राजेश शिरवईकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अशोक पत्की यांच्या संगीताची जोड लाभली आहे. तर हे हृदयस्पर्शी गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायले आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
एक प्रख्यात डॉक्टर आणि जुन्या परंपरेला मानणाऱ्या किरवंताच्या विचारांमधील लढाई यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यात या दोघांपैकी एकावर संकट आल्याचे दिसत आहे. या संकटाशी झुंज देताना मनातील घालमेल या गाण्यातून शब्दरूपाने समोर येत आहे. या गाण्याची प्रत्येक ओळ मनाला भिडणारी आहे. आता या संकटातून, संघर्षातून कसा मार्ग निघेल, हे प्रेक्षकांना 2 ऑगस्टलाच कळणार आहे.
‘होत्याचं नव्हतं झालं’ या गाण्याबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गाणे हे चित्रपटातील कथा संगीतरूपाने पुढे घेऊन जाण्याचे एक माध्यम असते. त्यामुळे ते तितकेच अर्थपूर्ण असणे गरजेचे आहे. हे गाणेही चित्रपटाची कथा पुढे घेऊन जाणारे आहे. सोबतच त्या व्यक्तिरेखेच्या मनातील घालमेलही उलगडणारे आहे. हे गाणे त्या परिस्थिचीचा मथितार्थ सांगणारे आहे. या गाण्याला जिवंत केले आहे ते या संगीत टीमने. या गाण्याचे सूर, शब्द, यातील प्रत्येक भाव हृदयापर्यंत पोहोचवणारे आहेत, असं साहिल शिरवईकर म्हणाले.
‘लाईफलाईन’मध्ये अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.