प्रतिनिधी (रमेश औताडे) :उन्हाचे चटके बसत असतानाच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ मानखुर्द मधील पी एम जी पी कॉलनी मधील रहिवाशांवर आली आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार तात्पुरती मलमपट्टी करून आश्वासन देत आहेत. आता तर मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदारी हे लोकप्रतिनिधी जातील. त्यावेळी मतदार त्यांना पाणी प्रश्नांबाबत विचारणार तर आहेच शिवाय कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही ? असा गंभीर सवालही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत करोडो रुपयांची विकास कामांची उद्घाटने करत असताना मानखुर्द मधील महिला भर उन्हात पाण्यासाठी हंडे घेऊन घराबाहेर पडत असल्याचे लाजिरवाणे चित्र मानखुर्द मधे दिसत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात हंडे घेऊन फिरत असताना मुलांच्या शाळा कॉलेज कडे या महिलांना लक्ष देता येत नाही. पालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी टँकर ची तात्पुरती व्यवस्था करत आहेत असे बोलले जाते मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. पालिका वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य संवाद होत नसल्याने तात्पुरती टँकर ची उपाययोजनाही होत नाही. असे सांगत संतप्त होत रहिवाशी आक्रमक झाले असून कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आपल्या मतदारांना पिण्याचे पाणी देता येत नसेल तर ते लोकप्रतिनिधी काय कामाचे ? मतदानाच्या दिवशी फक्त मतदाराला खूश करून स्वतः बीसलरी पाणी पिणारे लोकप्रतिनिधी काय कामाचे ? असा संतप्त सवाल येथील महिला करत आहेत. पुरुष मंडळी पोटापाण्यासाठी कामावर जातात आम्हालाच हंडे घेऊन फिरावे लागत आहे. लोकप्रतिनिधींना महिलांचा आदर आहे की नाही ? असेल तर कायमस्वरुपी उपाययोजना करा.अशी मागणी या महिला करत आहेत.
पाण्याच्या पाइपलाइन जवळ विकास कामे सुरू आहेत.रस्ते खोदले आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. रस्ता अरुंद असल्याने टँकर पोहचत नाही अशी कारणे सांगणारे पालिका अधिकारी काहीतरी उपाय करणार आहेत की नाही. लोकप्रतिनिधी वारंवार देत असलेली आश्वासने व खोटी समजूत यावर किती दिवस विश्वास ठेवायचा ? असा संतप्त सवालही या महिला करत आहेत.
खासदार राहुल शेवाळे यांनी या पाणी समस्यावर पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र काही दिवस अधिकारी चांगले काम करत होते. मात्र पुन्हा पाण्यासाठी हंडे घेऊन जाण्याची वेळ रहिवाशांवर आली आहेत. महिलांना हंडे घेऊन भर उन्हात जावे लागणे तेही मुंबई सारख्या आंतरराष्ट्रिय शहरात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशात शोभते का ? पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन करोडो रुपयांची विकासकामे करत स्वतःचे कौतुक करत असताना महिला हंडे घेऊन पाण्यासाठी त्रस्त आहेत .