प्रतिनिधी : जेष्ठ अभिनेत्री सर्वांच्या आऊ उषा नाडकर्णी यांच्या कुटुंबाविषयी सांगायचं तर त्या माहेरच्या उषा कलबाग. त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत म्हणजे ग्रँड रोड, नाना चौक, गिरगाव या परिसरात गेलं. त्या मूळच्या कारवारच्या पण अनेक वर्ष वास्तव्याने आणि महत्वाचे म्हणजे मनाने त्या मराठी आणि मुंबईकर. त्यांच्या आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या तर वडील एलआईसी मध्ये नोकरीला. उषा यांना एकूण तीन भावंडं, त्यांचा एक भाऊ १९७५ मध्ये गेला तर दुसरी बहीण २०१६ मध्ये गेली. या चारही भावंडांचा एकमेकांवर प्रचंड जीव. त्यामुळे दोन भावंडं गमावल्याची खंत त्यांना आजही वाटते.
मात्र एक धाकटा भाऊ मंगेश हा उषा यांचा मोठा आधार होता, त्यांचा सोबती होता. आधीच दोन भावंडं गमावल्याने उषा आणि मंगेश यांच्यातील नाते अत्यंत अतूट आणि हळवे होते. आयुष्यातली अनेक सुख दुःख या बहीण भावांनी एकत्र पाहिली आहेत. उषा ताईंच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात भाऊ मंगेश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहिले. अगदी आजही म्हणजे वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांना भावाचा मोठा पाठिंबा आणि आधार वाटत होता. गणपती असो कोणते सणवार किंवा वाढदिवस… उषा मंगेश हे भाऊ बहीण सर्व सोहळे एकत्र मिळून साजरा करायचे. माझ्या आयुष्यात माझ्या भावाचं स्थान खूप वेगळं आहे असं त्या कायम सांगतात. आणि अशा आपल्या लाडक्या भावाचे अचानक निधन झाल्याने उषा नाडकर्णी यांना मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागत आहे.