प्रतिनिधी : आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापाठी असलेल्या वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकरी आक्रमक झाले. यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत पालखी समोर ठिय्या मांडला.
आज ज्ञानोबांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये आगमन झाले. या परतीच्या प्रवासात पुरंदर तालुक्यातील निरा येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरास्नान घातले जाते. हे निरास्नान झाल्यानंतर रथाच्या पुढे आणि पाठीमागे ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यातील वारकरी दर्शनासाठी पादुका दिंड्यापर्यंत घेऊन जातात. मात्र, यावर्षी निरास्नान झाल्यानंतर फक्त रथाच्या पुढे पादुका दर्शनासाठी नेण्यात आल्या, रथाच्या पाठीमागे पादुका येणार नसून वारकऱ्यांनी रथाजवळ येऊन दर्शन करावे असे सांगण्यात आल्यानंतर वारकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त वारकऱ्यांनी पालखी पुढेच पुढे ठिय्या मांडला. परंपरा मोडीत काढू नका अशी मागणी वारकऱ्यांनी केली.