नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शहाबाज गाव, सेक्टर 19, बेलापूर येथे शनिवार, दि.27 जुलै 2024 रोजी इंदिरा निवास ही 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती सकाळी 4.45 वाजता नवी मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष येथे प्राप्त झाली. त्यानुसार लगेचच सकाळी 5.00 वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही तत्परतेने घटनास्थळी येत बचाव कार्याला गती दिली. त्याचप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. शरद पवार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. राहुल गेठे तसेच बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एन.डी.आर.एफ.च्या टीमलाही पाचारण करण्यात आले. घटना स्थळी पोहोचल्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने, एन.डी.आर.एफ.टीम व पोलीसांच्या सहकार्याने बचावकार्य सुरु केले. तेथील रहिवाश्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 05 व्यक्ती मलब्याखाली दबले गेले असल्याची शक्यता लक्षात घेत शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध कार्यादरम्यान मलब्याखालून लल्लुददीन नाझीर पठाण (पुरुष -वय 23 वर्ष) आणि रुखसार ललुददीन पठाण (महिला-वय 19 वर्ष) अशा 02 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले व त्यांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय,वाशी येथे तात्काळ दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वरील सर्व उपचार महानगरपालिकेमार्फत मोफत करण्यात येत आहेत. तसेच या शोध कार्यादरम्यान मोहम्मद मिराज (पुरुष-वय 29 वर्ष, मुळ राहणार-प्रतापगड, उत्तर प्रदेश), शफिक अहमद अन्सारी (पुरुष-वय 30 वर्ष, मुळ राहणार-भिवंडी, ठाणे) व मिराज अन्सारी (पुरुष-वय 24 वर्ष मुळ राहणार-जौनपुर, उत्तर प्रदेश) अशा 03 व्यक्तींचे देह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले व त्यांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय,वाशी येथे पाठविण्यात आले. त्या ठिकाणी तपासणी अंती सदर तिन्ही व्यक्ती मृत असल्याचे घोषित करण्यात आले आणि शोध व बचाव कार्य मोहीम दुपारी 3.40 वाजता पुर्ण करण्यात आली. त्याचप्रमाणे, मृत व्यक्ती यांचे मृतदेह त्यांच्या मुळ गावी पाठविण्याची व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली असून महापालिकेमार्फत मृत व्यक्तिंच्या कुटूंबाकरीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्याकरीता मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सदर इमारतीमध्ये एकूण 3 दुकाने व 17 घरे (फ्लॅट) होती. इमारतीतून 39 प्रौढ आणि 16 मुले हे इमारत पडण्याआधीच सुरक्षित बाहेर पडल्याचे निदर्शनास आले. त्या सर्व व्यक्तींना बेलापूर विभागातील आग्रोळी येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले व त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची तसेच अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर दुर्घटनास्थळी एन.डी.आर.एफ टीमचे शोध व बचाव कार्य पूर्ण झाले असून त्या ठिकाणी असलेला मलबा हटविण्याचे काम अग्निशमन दल व बेलापूर विभाग कार्यालय यांच्यामार्फत सुरु आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या दुर्घटनेत तत्पर मदतकार्य करण्यात आले. तथापि महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींमधील रहिवास नागरिकांनी त्वरित थांबवावा. तेथील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.



