प्रतिनिधी : जुलै महिन्यात मोरबे धरण क्षेत्रात आज (शुक्रवार) जुलैपर्यंत मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण 2407 मिमी इतका पाऊस झाला आहे. यामुळे मोरबे धरणामध्ये एकूण 74 % पाणी साठा उपलब्ध झाल्याने नवी मुंबई महापालिकेने 15 जूनपासून सुरू केलेली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी कपात रद्द केली आहे. 29 जुलैपासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या मोरबे धरणामधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास पाणीपुरवठा होत असून, यावर्षी पावसाळी कालावधी सुरू होऊनही 15 जूनपर्यंत केवळ 78.60 मिमी इतकाच अपुरा पाऊस झालेला होता. त्यावेळी मोरबे धरणामध्ये फक्त 26 % इतकाच पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठयात वाढीव कपात करण्यात आलेली होती. मोरबे धरणाची पाणी पातळी खालावल्याने सुरूवातीला 28 दिवस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबईतील आठ ही विभागात आठवड्यातून चार दिवस एकवेळ पाणीकपात सुरू केली.