प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनेही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत जागावाटप व्यवस्थित व्हावं, यासाठी पक्षाच्या १० नेत्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये कोणकोणते सदस्य असतील, याबाबतची माहिती काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसने नेमलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन अशा दहा नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसने नेमलेल्या समितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. नितीन राऊत, नसीम खान, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख या नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जागावाटपाच्या चर्चेसंबंधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत ती जागा सदर पक्षाला सोडली जावी, त्याव्यतिरिक्तचे जे मतदारसंघ आहेत तिथं स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन जागावाटप व्हावं, यावर पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही जागावाटपाचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहू नये, असा मविआ नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच निवडणूक जाहीर होण्यास अवधी असतानाही नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.