१९९० महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गिरगांव चौपाटी येथील शिवसेना भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही” असे ठणकावून सांगितले. हीच हिंदुत्वाची बाळासाहेब ठाकरे यांची व्याख्या पुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरि ओम करीत संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमविली. पण २०१९ च्या २८ नोव्हेंबरला जसे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. तेंव्हा पासून भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तीलांजली दिल्याची कोल्हेकुई सुरु केली. ही कोल्हेकुई शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडून बेकायदेशीर पणे सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी अद्यापही सुरुच आहे. मोघलांना जळी स्थळी काष्टी पाषाणी जसे संताजी धनाजी दिसत होते तद्वतच या लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री सुद्धा जागेपणी, झोपल्यावरही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे दिसत आहेत. मग जनाब, मौलाना अशी बिरुदावली लावायलाही मागे पुढे पहात नाहीत. खरं पहायला गेलो तर १९८७ च्या विलेपार्ले येथील महाराष्ट्र विधानसभेच्या पोट निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने सर्वप्रथम हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि या निवडणुकीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांना समर्थन दिले होते आणि भारतीय जनता पार्टीने जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता. शिवसेना या निवडणुकीत जिंकली. कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल करतांना हिंदुत्वाचा प्रचार धर्माच्या आधारे केल्यामुळे शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. परिणामी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. रमेश प्रभू या दोघांना सहा वर्षांसाठी मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. डॉ. रमेश प्रभू यांची आमदारकी रद्द ठरविण्यात आली. हिंदुत्वासाठी ही किंमत शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि डॉ. रमेश प्रभू यांना मोजावी लागली. भाजपचे चाणक्य प्रमोद महाजन यांना या निवडणुकीमुळे हिंदुत्वाचे कार्ड चालू शकते अशी उपरती झाली आणि मग त्यांनी शिवसेनेबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती करण्यात आली. या वेळीही राजकारणाचे छक्के पंजे न समजणाऱ्या साधे सरळ वागणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना प्रमोद महाजन यांनी विधानसभेच्या २८८ जागांपैकी शिवसेनेला १७१ जागा देण्याचे औदार्य दाखवून आणि स्वतः ११७ जागा लढवितांना जिथे शिवसेना जास्त जागा जिंकू शकते अशा विदर्भात कमी आणि जिथे काहीच उपयोग नाही अशा पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा दिल्या. परिणामी जास्त जागा लढविणाऱ्या शिवसेनेला ५२ जागा जिंकता आल्या तर कमी जागा लढविणाऱ्या भाजपने ४२ जागा पदरात पाडून घेतल्या. थोडक्यात सत्ता हुकली परंतु त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद धराशायी झाल्यावर पत्रकारांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर सिंह भंडारी यांना, “बाबरी किसने गिराई ?” असा प्रश्न विचारला तेंव्हा त्यांनी सरळसरळ काखा वर केल्या आणि “नहीं, वह बीजेपी के नहीं थे, आरएसएस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हीएचपी के नहीं थे” असे उत्तर दिले. तेंव्हा पुन्हा विचारणा केली की फिर वह कौन थे ? त्यावर “वे शायद शिवसेना के होंगे !” असे सांगितले. याच वेळी वांद्र्याच्या कलानगर मातोश्री येथून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे या अस्सल वाघाने डरकाळी फोडली आणि सुस्पष्ट शब्दांत सुनावले की, बाबरी उद्ध्वस्त करणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. याच वेळी ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी “गर्व से कहो हम हिंदू है” असे लिहिलेली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले बाबरी उद्ध्वस्त होतांनाची दिनदर्शिका प्रकाशित केली. त्यावर बंदी घालण्यात आली. हिंदुत्वासाठी नेहमीच बाळासाहेबांनी स्वतः नमते घेत भारतीय जनता पक्षाला मोठेपणा दिला. इतकेच काय तर अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असतांना २००२ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा प्रकरणी वाजपेयी यांनी वक्रदृष्टी करताच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी, “मोदी को हात मत लगाओ, मोदी गया तो समझो गुजरातसे भाजप गया”, असा सुस्पष्ट निरोप लालकृष्ण अडवाणी यांच्यामार्फत अटलबिहारी वाजपेयी यांना दिला. ही चित्रफीत /ध्वनी फीत अजूनही गुजरातमध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये वाजविण्यात येते. त्याच सुमारास शंकरसिंह वाघेला हे भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेनेत यायला आणि शिवसेनेचे गुजरातचे मुख्यमंत्री व्हायला तयार झाले होते. मातोश्री येथे येऊन वाघेला यांनी ही आर्जवे केली. परंतु आम्ही वाघ आहोत, वाघेला नव्हेत, असे ठणकावून सांगत नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. सातत्याने भारतीय जनता पक्षाला साथ दिली आणि दिल्ली तुम्ही सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, आपण दोघे मिळून राष्ट्र आणि राज्य चालवू, अशी सामंजस्याची भूमिका घेतली. २०१२ पर्यंत व्यवस्थित सुरू होते प्रमोद महाजन यांची दुर्दैवी हत्या झाली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण झाले. २०१३ साली नरेंद्र मोदी यांचे नांव भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुक्रर झाले. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि २६ मे २०१४ रोजी नरेंद्र दामोदरदास मोदी हे पंतप्रधान झाले. भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार निवडून आले, भारतीय जनता पक्षाचे बहुमत असतांनाही केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. दुर्दैवाने ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचे देहावसान झाले. इथेच माशी शिंकली. मुंडे यांनी ज्या देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले त्यांच्या हाती महाराष्ट्र भाजपाची सर्व सूत्रे आली. २४ सप्टेंबर २०१४ रोजी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ खडसे यांनी शिवसेनेबरोबरची पंचवीस वर्षे जुनी युती तोडण्याची घोषणा केली. श्रेष्ठींच्या सांगण्यावरुन आपल्याला ही घोषणा करावी लागल्याची कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका शिवसेना, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे लढविल्या आणि श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अभिमन्यू प्रमाणे एकटेच लढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आनंदीबेन पटेल, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आदी सर्वच नेत्यांना अंगावर घेऊन एकहाती ६३ जागा जिंकल्या. नरेंद्र मोदी यांची लाट होती. तरीही भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला १२३ जागा आल्या. उठता बसता शरद पवार यांच्या नांवे बोटे मोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे अल्पमतातले सरकार शरद पवार यांनी वाचविले. १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ पर्यंत शिवसेनेचे एकनाथ संभाजी शिंदे हे विरोधी पक्षनेते होते. २२ वर्ष बदनामी सहन करावी लागली नाही तितकी २२ दिवस बदनामी सहन करावी लागली असे सांगत ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी अल्पमतातील सरकारचे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी चंद्रकांतदादा पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना मातोश्रीच्या दारात पाठवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपली खुर्ची पाच वर्षे अबाधित राहण्यासाठी पाठिंबा मागितला. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पाठिंबा दिला. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारात सहभागी झाली. उद्या आमची सत्ता आल्यास आमच्या लोकांना अनुभव मिळेल आणि तसेही आम्ही रस्त्यावर लढणारे लढवय्ये असून आम्ही जनतेशी बांधिलकी ठेवून आहोत, ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकटी लढणार अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाने सोबत येण्यासाठी गळ घातली म्हणून उद्धव ठाकरे तयार झाले. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी सुद्धा अमित शाह मुंबईत आले. सॉफिटेल, मातोश्री येथे बंद दाराआड उद्धव ठाकरे यांच्या समवेत चर्चा केली. या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाराबाहेर बसून होते. वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेल मध्ये भरगच्च पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्याचे सांगतांना जबाबदाऱ्या ५०-५०% मान्य असल्याची, नाणार जाणार अशी घोषणा केली. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ३०३ खासदार निवडून आले. शिवसेनेचेही १८ खासदार निवडून आले. महायुती जबरदस्त पुढे आली. संपूर्ण महाराष्ट्र जसा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ढवळून काढला तद्वतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या घणाघाती सभा सुद्धा सर्वत्र झाल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आणि भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आले. परंतु १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अमित शाह यांनी दिलेला शब्द मोडण्यात आला. सत्तासंपादनाचे गुऱ्हाळ सुरुच होते. शिवसेना समर्थन देत नाही तोवर सरकार बनविणार नाही असे म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्ष नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना सोबत घेऊन २३ नोव्हेंबर २०१९ च्या सक्काळी सक्काळीच राजभवनावर जाऊन शपथविधी उरकून घेतला. बऱ्याच घडामोडी घडल्या. पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नांवे ८० तासाचे मुख्यमंत्री होण्याचीही नोंद झाली. कारण अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली नाहीत. भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केल्यानंतर श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. संकटे एकापाठोपाठ एक येऊ लागली. कोरोना महामारीने उच्छाद मांडला. स्वतः उद्धव ठाकरे यांच्यावर इस्पितळात दाखल होण्याची वेळ आली. अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांसोबत सर्वोत्तम कामगिरी केली. आपल्या वाहन चालविणाऱ्या सारथ्याला कोरोना होऊ नये म्हणून स्वतः मोटार चालवत पंढरीच्या पांडुरंगाच्या शासकीय महापूजेचे महत्कार्य केले, १ मे रोजी हुतात्मा चौकातही स्वतः मोटार चालवत हुतात्म्यांना अभिवादन केले. देश पातळीवर एकदा दोनदा नव्हे तर चक्क चार वेळा पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये गणना झाली, ज्यात भारतीय जनता पक्षाचे एकही मुख्यमंत्री नव्हते. अनाथांची माय म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी तोंडभरून मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करतांना बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचे संस्कार तुझ्यात आहेत, बाळासाहेबांचे रक्त आणि मीनाताईंचे दूध तुझ्या धमन्यात आहे, बाळा उद्धव, तू यशस्वी निश्चितच होशील, असा आशीर्वाद दिला. भारतीय जनता पक्षाने या काळात सर्वच प्रथा परंपरा मोडीत काढून शिवसेनेला जबाबदार विरोधीपक्ष म्हणून साथ देण्याऐवजी त्रास देण्याचेच काम केले. आणखी पराकोटीला जात शिवसेना फोडण्याचे, लोकशाहीचा गळा घोटण्याचे अश्लाघ्य काम केले आणि मग माझा एक जरी सहकारी विरोधात उभा राहिल्यास मी पदावर राहणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि वर्षा निवासस्थान क्षणार्धात सोडून रात्रीच्या रात्री मातोश्री येथे येणे पसंत केले. अख्खा महाराष्ट्र हळहळला. महाविकास आघाडी सरकार चांगले चालत असतांना चालत्या गाडीला खीळ घातली गेली. दोन वर्षे तीच तीच ध्वनीफीत/चित्रफीत वाजविण्यात येत आहे. स्वतः गोल टोप्या घालून सीरकुरमा ओरपणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह तमाम शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा उचललाय. परंतु सुब्रह्मण्यम स्वामींपासून तो ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे हिंदुत्ववादी असल्याचा निर्वाळा दिला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला असून ते पुन्हा मुख्यमंत्री होईस्तोवर हे दुःख दूर होणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करणारे हिंदू असूच शकत नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे मातोश्री येथे विधिवत पाद्यपूजन करुन श्री. उद्धव ठाकरे, सौ. रश्मी उद्धव ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे या संपूर्ण परिवाराने आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांचे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हिंदुत्व कसे खणखणीत आहे, यावर धर्माचाऱ्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेला बाकी कुणाच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही. महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० साली गिरगांव चौपाटी येथील शिवसेना भाजप युतीच्या जाहीर सभेत सांगितलेली, मुंबई उच्च न्यायालयातील डॉ. मनोहर जोशी यांच्या निवडणूक खटल्यात वकील जय चिनॉय यांनी माझ्या तोंडून रेकॉर्ड वर आणलेली आणि ११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे. एस. वर्मा यांनी डॉ. मनोहर गजानन जोशी यांना निर्दोष मुक्त करतांना मान्य केलेली हिंदुत्वाची व्याख्या महत्वाची आहे. हे सर्व पुन्हा एकदा विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विस्मृती होऊ नये. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे श्री. उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर टिकलेले भाजप सरकार भाजपचे नेते मानायला तयार नसले तरी ती वस्तुस्थिती आहे आणि सुंदरसिंह भंडारी यांनी काखा वर केल्यानंतर “जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे”, अशी फोडलेली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची डरकाळी, त्याचा वारंवार श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे करीत असलेला पुनरुच्चार ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण बाळासाहेबांचे आणि माँ साहेबांचे सुपूत्र आहात आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मार्मिक, दैनिक सामना आणि दोपहर का सामनाचे संपादक आहात. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान आपल्या नेतृत्वाची प्रतीक्षा करीत आहे, १९६६ पासूनचा शिवसैनिक बेलभंडार उचलण्यास सिद्ध झालेला आहे, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा आशीर्वाद आहे. बाटग्यांच्या बांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही, आपले हिंदुत्वाचे नाणे कसे खणखणीतच आहे. करा पुनश्च हरी ॐ. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, आपणांस उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो या आई एकवीरा देवी आणि आई तुळजाभवानी मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना !
-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).