सातारा(अजित जगताप) : छत्रपतींच्या राजधानीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे व मान्यवरांनी साताऱ्यात अनेक आंदोलने केली. त्यांना श्रेय देण्यापेक्षा लोकप्रतिनिधीमध्येच चढाओढ लागलीहोती .आता साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना छत गळतीमुळे कोट ऐवजी रेनकोट घालण्याची वेळ आलेली आहे. याबाबत शिवसेनेने (उबाठा) आंदोलनाची मशाल हाती घेतल्याने खळबळ माजली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. हे महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे आणि त्याची स्थापना २०२१ मध्ये झाली. दुसरे छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय सातारा असे त्याचे नामकरण करण्यात आले. वास्तविक पाहता या वैद्यकीय विद्यालयाला २०१४ साली मंजुरी मिळाली होती .त्यावेळेला शंभर विद्यार्थी व पाचशे रुग्णांचे खाटा असे त्याचे समीकरण होते. या महाविद्यालयात देशभरातील ३०० विद्यार्थी एम.बी.बी.एस. चा अभ्यासक्रम करत आहेत. यंदाच्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. असे राजकीय आश्वासन दिले होते. पण, जे राज्यकर्ते मतदारांचे आश्वासन पाळत नाहीत ते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी कशी घेतील ? असा आता प्रश्न शिवसेनेला पडलेला आहे.
आदरणीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सातारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केली असता सर्व आलबेल असल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालय परिसरातही तशीच अवस्था असल्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीसी सामना करावा लागत आहे. या ठिकाणी प्राध्यापक व महाविद्यालयातील कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचारी असे मिळून २०० लोक कार्यरत आहे. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

