
सोलापूर : चर्मकार समाजातील तरुणाला विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पोलीस अधीक्षकांकडे केली.
याबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शिष्टमंडळाने मार्गदर्शक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक कुरी यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथील विष्णू प्रताप शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सांभाळून आपली गुजरान करतात.
गरीब आणि होतकरू असलेले विष्णु शिंदे यांना 24 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने काही कारण नसताना कसलाही व्यवहार त्याच्याशी नसताना आई-बहीण वर शिवीगाळ केली तसेच स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून मोहोळ पोलीस ठाण्याला ये अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे धमकावून जातिवाचक शिवीगाळ करत तुला बघतो, तुझ्याविरुद्ध तक्रार आली आहे, असे सांगून बराच वेळ तो धमकावत होता. यादरम्यान त्याने दोन ते तीन वेळा जातीवाचक शिवीगाळ करत विष्णु शिंदे यांच्या भावना दुखावल्या.
त्याच्या शिवीगाळीचे आणि दमदाटीचे कारण ही समजले नसून त्या नावाची व्यक्ती मोहोळ पोलीस ठाण्यात नसल्याचे हे समजले. या प्रकारामुळे शिंदे कुटुंबीय हे भयभित झाले आहेत.
त्यांना दोन लहान मुले पत्नी आणि वयस्कर आई-वडील असून तेही या प्रकाराने प्रचंड घाबरले आहेत.
या प्रकारानंतर विष्णु शिंदे हे बुधवार 25 जुलै 2024 रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राऊत यांची भेट घेऊन घडला प्रकार कथन केला. त्यानंतर त्यांच्या खाली असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने जुजबी तक्रार नोंदवून घेऊन दमदाटी करणाऱ्या व्यक्ती विरोधात अदखलपात्र (एन. सी.) गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता त्याने जातीवाचक शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग अधिकाऱ्यांना ऐकविले असतानाही ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करणे टाळून केवळ एनसी दाखल करून विष्णु शिंदे यांच्यावर अन्याय केला आहे.
या घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत असून धमकावणाऱ्या आरोपी विरुद्ध त्वरित ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि या गुन्ह्यात हलगर्जी करणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल. असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने दिला आहे.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे गणेश तुपसमुद्रे अजय राऊत शिवपुत्र वाघमारे, शावरप्पा वाघमारे, मलिक हब्बु बाळासाहेब आळसंदे, रवि काबळे प्रदीप लाबतुरे आशोक सुरवशे राजेंद्र कांबळे, चद्राकात मग्रुमखाने आदिनाथ ढेरे, रामचंद्र पठोड आदि उपस्थित होते.