Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रजेंव्हा इंदिरा गांधी या वि. स. पागे यांच्या समोर विद्यार्थिनी म्हणून बसतात...

जेंव्हा इंदिरा गांधी या वि. स. पागे यांच्या समोर विद्यार्थिनी म्हणून बसतात ! -योगेश वसंत त्रिवेदी

प्रतिनिधी : २ एप्रिल २०२४ हा माझ्या जीवनातील परम भाग्याचा दिवस. या दिवशी थोर स्वातंत्र्यसेनानी आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तब्बल १८ वर्षे सभापती पदावर विराजमान राहिलेल्या विठ्ठल सखाराम उर्फ वि. स. पागे यांचे त्यांच्या इतकेच तल्लख बुद्धीचे चिरंजीव प्रकाश विठ्ठल पागे यांची भेट झाली. या भेटीत विठ्ठल सखाराम उर्फ वि. स. पागे या थोर व्यक्तिमत्वाबद्दल काही महत्वपूर्ण घटना ऐकायला मिळाल्या. तशी माहिती होती परंतु या घटना ‘हॉर्सेस माऊथ’ ऐकण्यात एक अनोखा आनंद होता. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त सध्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ फेब्रुवारी १९२१ ते १९ फेब्रुवारी २०२१ या शंभर वर्षातील विविध निर्णय, धोरणे, प्रस्ताव, ठराव यावर ग्रंथ संपादनाचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, केंद्र संचालक नीलेश मदाने, ग्रंथालयाचे ग्रंथपाल नीलेश वडनेरकर, उपग्रंथपाल शत्रुघ्न मुळे यांच्या समवेत विलास मुकादम, किशोर आपटे, शीतल करदेकर, उदय तानपाठक, दिनेश गुणे, संजय जोग असे आम्ही पत्रकार आणि सत्यवान ताठरे, प्रमोद तेंडुलकर आदी मान्यवर या कार्यासाठी गेल्या ऑगस्ट पासून झोकून देऊन परिश्रम घेत आहोत. २ एप्रिल २०२४ रोजी माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या सोबत वि. स. पागे यांचे चिरंजीव प्रकाश पागे विधानभवनात आले. श्री. शत्रुघ्न मुळे यांच्या दालनात आम्ही उल्हासदादा, प्रकाशराव, मदाने, मुळे, मुकादम आणि मी असा गप्पांचा फड रंगला. आम्ही होतो श्रोत्यांच्या भूमिकेत. प्रकाशराव बोलत होते आणि आम्ही अक्षरशः तल्लीन होऊन ऐकत होतो. महाराष्ट्र विधानमंडळात एक काळ गाजविणारी पागे भारदे जोडी होती. विठ्ठल सखाराम पागे हे विधानपरिषदेचे सभापती तर त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे अध्यक्ष. रोजगार हमी योजना वि. स. पागे यांनी आणली आणि ती मग केंद्र सरकारने सुद्धा स्वीकारली. एकदा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वि. स. पागे यांना फोन केला आणि दिल्लीत बोलावून घेतले. “आय ॲम नॉट अ प्राईम मिनिस्टर. आय ॲम जस्ट युवर स्टुडंट. आय ॲम सिटिंग इन फ्रंट ऑफ यू विथ पेन्सिल ॲंड नोटबुक. प्लीज टेल मी युवर स्कीम. आय वॉंट टू अंडरस्टॅंड द स्कीम ॲंड हाऊ टु इम्प्लिमेंट धीस स्कीम इन अवर नेशन.” (मी आता पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमची विद्यार्थिनी म्हणून तुमच्या समोर कागद पेन्सिल घेऊन बसते. मला तुमच्या योजना समजावून सांगा. मला या योजना देशभरात कशा अंमलात आणता येतील हे तुमच्या कडून जाणून घ्यायचे आहे, समजावून घ्यायचे आहे.) आणि चक्क इंदिरा गांधी या वि. स. पागे यांच्या समोर मांडी घालून बसल्या. सुमारे एक तास वि. स. पागे यांनी इंदिराजींना संपूर्ण योजना समजावून सांगितली. इंदिरा गांधी यांनी वीस कलमी योजना अंमलात आणली, त्या योजनेचे जनक सुद्धा वि. स. पागे हेच होत. संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी संपूर्ण मुखोद्गत असलेल्या वि. स. पागे यांचा तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या संदर्भातील एक किस्सा सांगतांना प्रकाशराव म्हणाले, “एकदा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे व्याख्यान होते. हे व्याख्यान संपूर्ण इंग्रजी भाषेत होते. या व्याख्यानानंतर त्याचा मराठी भाषेत अनुवाद करुन सांगण्याची जबाबदारी वि. स. पागे यांच्यावर होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे व्याख्यान सुरु असतांना एका कोपऱ्यात वि. स. पागे छोटासा कागद हातात धरुन केवळ आद्याक्षरे लिहित होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे व्याख्यान झाले. वि. स. पागे हे मराठी भाषेत व्याख्यानाचा अनुवाद करतील अशी संयोजकांनी उद्घोषणा केली. आणि मग वि. स. पागे यांनी जे मराठी भाषेत शब्दशः संपूर्ण व्याख्यान उपस्थितांसमोर केले त्याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् अतीशय भारावून गेले. मी दिलेले व्याख्यान पुन्हा करायला सांगितले तर शब्दशः करु शकणार नाही. इट्स इम्पॉसिबल. परंतु तुम्ही तर अगदी कमालच केली. तुमच्या या व्हर्बॅटम व्याख्यानाला तोडच नाही. मी तुमच्या बुद्धिचातुर्यासमोर नतमस्तक आहे, अशा शब्दांत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी वि. स. पागे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. महाराष्ट्र विधिमंडळाचा पागे भारदे यांच्या वेळचा अगदी शंभर कॅरेटचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. पागे भारदे यांची भाषणे विधिमंडळ ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ही भाषणे तर आपल्या सर्वांना शहाणे करून सोडणारी ठरतील. प्रकाशराव पागे यांचे बुद्धिचातुर्यही वाखाणण्याजोगे आहे. आपण शिवशाही सरकारच्या काळातील नितीन गडकरी यांनी उभारलेले ५५ उड्डाणपूल आणि मुंबई पुणे दृतगती महामार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू एवढेच जाणतो. परंतु या आणि सुमारे तीनशे प्रकल्पांचे पडद्यामागील शिल्पकार तर प्रकाशराव पागे आहेत आणि मागील तसेच विद्यमान राज्यकर्ते हे याचे साक्षीदार आहेत. विठ्ठल सखाराम पागे हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बामणी या गावी २१ जुलै १९१० रोजी जन्मले. उच्चविद्याविभूषित वि. स. पागे हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५२ ते१९६० विधानपरिषदेचे सदस्य होते. ते १९६० पासून १९७८ अशी तब्बल अठरा वर्षे विधानपरिषदेचे सभापती होते. याच दरम्यान महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यातून वि. स. पागे यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळूप यांच्या व तमाम सत्ताधारी आणि विरोधकांच्या सहकार्याने राज्याला ललामभूत ठरणारी रोजगार हमी योजना आणली. स्वतः धर्मपत्नी प्रभावती देवींच्या सहकार्याने केवळ सातशे रुपयांत स्वतःच्या शेतात बारा ते पंधरा मजूरांना रोजगार देत आधी केले आणि मग सांगितले या न्यायाने ही योजना राज्यात राबवून राज्य सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. शत्रुघ्न मुळे यांच्या दालनात आम्ही तहानभूक वेळ विसरुन गेलो आणि त्या महान नेत्यांसाठी, त्यांच्या बुद्धि चातुर्यासाठी नतमस्तक होऊन प्रकाशरावांना साष्टांग दंडवत घातला. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. या थोर विठ्ठलाच्या एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. महाराष्ट्र आणि हिंदुस्थानला नैतिकतेचे धडे गिरवून सुजलाम सुफलाम करण्यासाठी ‘पागे भारदे’ यांनी पुनश्च अवतार घ्यावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! लई मागणे न्हाई.

-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments