मुंबई : “आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत निराधार आरोप केले” अशी टीका शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. तसेच गेल्या आठवड्यात मुंबईत जो शाही विवाह सोहळा पार पडला, ‘ त्या ‘ मित्राच्या हितासाठी माननीय उद्धवजी हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून आदानी वर बोगस आरोप करत आहेत, असाही हल्ला शेवाळे यांनी चढविला. चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेवाळे यांनी ही टीका केली.
आपल्या पत्रकार परिषदेत शेवाळे म्हणाले की, माननीय उद्धवजी ठाकरे यांनी अचानक धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेऊन निराधार टीका का केली? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. धारावीकरांना पुनर्विकासात 350 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय हा माननीय उद्धवजींना विश्वासात घेऊन करण्यात आला होता. सीआरझेड ची नियमावली, हवाई वाहतुकीबाबतचे नियम या सगळ्या बाबींचा विचार करून धारावीत 350 स्क्वेअर फुटापेक्षा मोठे घर देता येणार नाही, ही वस्तुस्थिती त्यांनाही ठाऊक आहे. मात्र तरीही केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी 500 स्क्वेअर फुटांच्या घराचा अवास्तव मुद्दा विरोधकांकडून समोर आणला गेला. तसेच धारावीतील निसर्ग उद्यान, धारावी कोळीवाडा, मलनिःसारण प्रकल्प यांसारख्या बाबींमुळे धारावीत सध्या अस्तित्वात असलेली संपूर्ण जागा पुनर्विकासासाठी वापरता येणार नाही, याची देखील कल्पना सर्वांना आहे. मात्र तरीही, अदानी यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या मित्राच्या हितासाठी हे आरोप केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या काळात वेग आला असून, केवळ हा प्रकल्प रोखण्यासाठी विरोधकांकडून अवास्तव मागण्या आणि आरोप केले जात आहे. विरोधकांना धारावीकरांच्या हिताची कोणतीही काळजी नसून केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
वास्तविक, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आदानी यांचा प्रकल्प नसून राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच घर आणि दुकान मिळेल, तसेच अपात्र लोकांनाही घर दिले जाईल याची शाश्वती याआधी देखील शासनाने देऊ केली आहे. तरीही विरोधकांकडून वारंवार गैरसमज पसरवण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला.
चौकट -1
पक्षाच्या देणगीसाठी निराधार आरोप..
निवडणूक आयोगाने नुकतीच उबाठा गटाला देणगी स्वीकारण्याची मान्यता दिली आहे. आज धारावी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेले बिनबुडाचे आरोप
पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी होते का? असाही प्रश्न राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला.
चौकट-2
स्थानिक मुंबईकरांच्या भावना लक्षात घेणार
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुंबईतील विक्रोळी, मुलुंड, कुर्ला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या जागेबाबत स्थानिक मुंबईकरांनी नोंदवलेला आक्षेप आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊनच राज्य सरकार कृती करेल, अशी हमी देखील राहुल शेवाळे यांनी दिली.