मुंबई(रमेश औताडे) : गेल्या दोन तीन महिन्यापासून संविधान बाबतची सुरू असलेली चर्चा मी ऐकत होतो. मात्र संविधानाची हत्या कुणीही करू शकत नाही असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दिवंगत पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला.
धर्माधिकारी म्हणाले, वृत्तपत्राची पाहिली तीन चार पाने का वाचावीत असा प्रश्न पडला आहे. महापुरुष छोट्या कारणावरून भांडत नव्हते. त्यांचे लोकांवर प्रेम होते. त्यांचे योगदान फोल ठरत असल्याचे आज वातावरण तयार झाले आहे. संपादक पदी बढती मिळण्यापेक्षा दिनू रणदिवे यांना मिळालेला हा मान त्यापेक्षाही मोठा आहे असे धर्माधिकारी म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, मधू कांबळे यांची पत्रकारिता मी जवळून पाहिली आहे. समाजाचे ज्वलंत प्रश्न आंदोलन मोर्चे दलीत समाज आदी सर्व विषयावर त्यांची पत्रकारिता होती.
यावेळी मधू कांबळे म्हणाले, देशाची बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी सज्जनांनी सक्रिय होण्याची गरज आहे.मी पत्रकारितेच्या नोकरीतून निवृत्त झालो आहे. पत्रकारितेतून नाही. सरन्यायाधीश ज्यावेळी असे म्हणतात की, भारताच्या न्याय व्यवस्थेला धोका आहे. तेव्हा त्या विधानाची रॉ किंव्हा सी बी आय मार्फत चौकशी झाली पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, पत्रकार दिनू रणदिवे यांच्या बँक खात्यात किती रुपये होते यापेक्षा त्यांनी त्यांच्या जीवनात करोडो माणसे जोडली व माणसांची बँक जोपासली म्हणून आज या पुरस्कार सोहळ्यात एवढी गर्दी झाली आहे. दिनू रणदिवे आमच्या विचारत ३६५ दिवस आहेत. पत्रकारांना त्यांचे आज जे काही हक्क अधिकार मिळत आहेत ते दिनू रणदिवे यांच्यामुळेच मिळत आहेत.
प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष गूरबिर सिंग म्हणाले, भविष्यात पुरस्कार देण्यासाठी चांगले पत्रकार मिळतील का ? कुठे चालली आहे आजची पत्रकारिता ? असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. उत्तर प्रदेश मध्ये चार हजार यु टुब वर बातम्या देणाऱ्या संपादकांची मुस्कटदाबी केली गेली . मात्र त्यानंतर आठ हजार नवीन यु टुब वर बातम्या देणारे संपादक निर्माण झाले.
या वेळी समारंभाचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर, प्रेस क्लब चे मा.अध्यक्ष गुर्बिर सिंग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पुरस्कार समिती सदस्य प्रकाश महाडिक उपस्थित होते. यावेळी मुंबई प्रेस क्लब चे नवनिर्वाचीत अध्यक्ष समार खडस यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार विकास महाडिक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश महाडिक यांनी केले.