प्रतिनिधी : मानाची पालखी, पहिली पालखी सर्वात मोठी शिस्तबद्ध पालखी असा नावलौकिक असलेली ‘साई सेवक मंडळ, मुंबई यांची पालखीसह पदयात्रा सोहळा रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी साईनिकेतन खोदादाद सर्कल, दादर, मुंबई येथून दुपारी १२.०० वा. माध्यान्ह आरती करुन शिर्डी मुक्कामी निघणार आहे. सदर पदयात्रा सोमवार १५ एप्रिल २०२४ रोजी शिर्डी येथे पोहचेल.
वारकरी परंपरेनुसार चालणाऱ्या या पालखी सोहळ्याचे ४४ वे वर्ष असून सुमारे ८००० पदयात्री सहभागी होत असतात. पदयात्रेच्या ९ दिवसांत सकाळी ५.३० वा. पालखी पुजा, जप व आरती, दुपारी १२ वा. माध्यान्ह आरती, श्रीसाईसच्चरित ५ पोथ्यांचे सामूहिक पारायण व साईभंडारा तसेच श्री साईनाथ स्तवन मंजिरी वाचन होऊन सायं. ४ वा. पुढील मुक्कामासाठी प्रस्थान केले जाते. त्यानंतर सायंकाळी धुपारती व रात्रीचे मुक्कामी साईभंडारा असा दिनक्रम असतो.
या पालखी सोहळ्यात सदगुरु श्रीसाईनाथांच्या अस्तित्वाची प्रचिती पदयात्रींना वेळोवेळी येत असते. त्याची अनुभूती प्रत्यक्ष घेण्यासाठी आयुष्यात एकदा तरी पायी शिडींची वारी साई सेवक मंडळाच्या पालखी सोहळ्यातून साईभक्तांनी अनुभवयाला हवी. हा आनंद अनुभवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारों भाविक अगदी शिर्डी गावाहूनही या पदयात्रेत सहभागी होत असतात.
सर्व पदयात्री बंधुनीं गेल्या ४३ वर्षांची पारंपारिक शिस्त पाळावी, कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार पालखी सोहळ्यात करु नये, तसेच महाराष्ट्र शासन व शिर्डी संस्थानने आखून दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंडळाचे सचिव श्री. अशोक देसाई यांनी केले आहे.