Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रविधान परिषद निवडणूक म्हणजे जनतेचा कौल नव्हे…..!

विधान परिषद निवडणूक म्हणजे जनतेचा कौल नव्हे…..!

प्रतिनिधी (खंडूराज गायकवाड) :  चौदाव्या विधानसभेचा शेवटच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला.या पाच वर्षात राजकीय नितिमत्ता, पक्षांतर बंदी कायदा, राज्य घटना, संसदीय परंपरा आणि कामकाज अशा बऱ्याच गोष्टीचे आजवरचे प्रस्थापित राजकीय संकेत बाजूला ठेवत जो राजकीय कारभार चालविला हे संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेले असताना,याची पुनरावृत्ती ही या अधिवेशनाच्या शेवटच्या (ता. 12 जुलै )दिवशी बघायला मिळाली . विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून पाठवयाच्या अकरा जागाच्या निवडणूकीत फोडाफोडीचे राजकारण पुन्हा एकदा दिसले.विधान परिषदेच्या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा बळी जाणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती.त्यामध्ये भाजपाकडे पुरेशे संख्याबळ असल्याने त्यांचे पाच ही उमेदवार निवडून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे दोन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाचे दोन अशा महायुतीचे नऊ ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आलेले अपयशाचा वचपा काढल्याचा समज महायुतीच्या नेत्यांनी करून घेतला आहे.अन त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक आपल्याला सोपी जाईल, असे महायुतीच्या नेत्यांनी लगेच अनुमान काढायला सुरुवात केली.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये नेहमीप्रमाणे राजकीय हेवेदावे आणि वैचारिक गोंधळ सुरू होता.खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी अतोनात प्रयत्न केले होते. परंतु अचानक शिवसेनेने (उठाबा गट ) मिलिंद नार्वेकर यांना बारावा उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरविल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट )पुरस्कृत केलेल्या शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरली.रायगड लोकसभा निवडणुकीत अनंत गिते यांना शेकापने मदत केली नाही. त्यामुळे सुनिल तटकरे यांचा विजयी झाल्याचा समज करून उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी नेहमी प्रमाणे जो गोंधळ घालायचा होता. तो घातलाच. श्रीमती प्रज्ञा सातव यांना निवडून आणल्यानंतर शिल्लक मताचा कोटा कोणाकडे वर्ग करायचा यावर दोन दिवस घोळ सुरू होता. काँग्रेस मधील एक गट शेकापचे जयंत पाटील यांना शिल्लक मतं वर्ग करण्यावर ठाम होता. तर एक गट शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना शिल्लक मतांचा कोटा देण्यासाठी आग्रही होता. यामध्ये दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. असे अवस्था काँग्रेस पक्षाच्या गटबाजीमुळे झाली , अन शेवटी जे व्हायचे होते तेच झाले. यातून काँग्रेस पक्षाची सात ते आठ मतं फुटली. अन यांचा फटका शेकापचे जयंत पाटील यांना बसला.
या महाआघाडीच्या बिघाडीचा फायदा सत्ताधारी पक्षाने घेतला.महायुतीच्या नेत्यांनी विरोधी पक्षाचे आमदार फोडून सत्तेची हंडी फोडली.या विधान परिषद निवडणुकीत महायुतीची व्युहरचना योग्य होती. महायुतीकडे नऊ उमेदवार निवडून आणण्याइतपत संख्याबळ नव्हते, तर महाविकास आघाडीकडे तीन उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ नव्हते त्यामुळे घोडेबाजार होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अन यामध्ये महा युतीचे गणित परफेक्ट जुळले. तर महाविकास आघाडीतील मित्रांनी लोकसभा निवडणुकीतील एकमेकांचा हिशेब चुकता केला.
विधान परिषदेतील क्रॉस व्होटिंगसाठी आमदारांना विकास निधीच्या नावाखाली मोठ्या रक्कम आणि जमिनीचे तुकडे देण्यात आल्याचा आरोप त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट ) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आमदार विकले गेले आहेत.आगामी निवडणुकीत निवडून येण्याची खात्री नसल्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याची खरमरीत टिका केली आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल दिला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आणि काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र पिंजून काढून ऐतिहासिक यश मिळविले. 225 विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची छाप यातून दिसली आहे.असली कोण आणि नकली कोण याचे उत्तर सुद्धा जनतेने आपल्या मतामधून दाखवून दिले आहे. असे असताना सुद्धा फुटीर आमदारांना आपल्या भविष्य काळाची चिंता वाटली नाही. फोडाफोडीच्या राजकारणाच्या मोहात पडलेले लोकप्रतिनिधी हा निश्चितच महाराष्ट्राला कलंक आहे.हे जनता आगामी निवडूकीत दाखवून देतील. याबद्दल शंका नाही.
लोकसभा निवडणूक आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या यशपयशाचे मोजमाप करताना अनेक नेतेमंडळी विधानसभा निवडणूकीत जनतेची दिशाभूल करतील.आश्वासनाचा पाऊस पाडतील.मात्र आमदार फोडणे सोपे जरी असले तरी एकदा जनतेने निवडणूक हातात घेतली की, मतदार राजा कोणाच्या बापाचे ऐकत नाही. हे महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना दाखवून दिले आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की , विधान परिषदेची निवडणूक म्हणजे जनतेचा कौल नाही…!

खंडूराज गायकवाड
Khandurajgkwd@gmail.com

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments