Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रपत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर

पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर

प्रतिनिधी : ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार आणि भारताच्या समाजवादी चळवळीतील एक ध्येयवादी कार्यकर्ते दिवंगत श्री दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर झाला आहे. ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक समितीतर्फे येत्या १९ जुलै २०२४ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री सत्यरंजन धर्माधिकारी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर असतील.

दि. १६ जून, २०२० रोजी दिनू रणदिवे यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या श्रद्धांजली सभेत, रणदिवे यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकाराला प्रतिवर्षी ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानुसार, २०२१ साली जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री प्रताप आसबे, २०२२ साली ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर आणि २०२३ साली ज्येष्ठ पत्रकार श्रीमती ओल्गा टेलिस यांना ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. यंदा पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. २०२४ चा पुरस्कार श्री मधु कांबळे यांना देण्यात यावा असे, या पुरस्कारासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्यावतीने एकमताने ठरवण्यात आले. रु.२५,००० रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर हे असून प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री गुरबीर सिंग, हिंदुस्थान टाइम्स (मराठी)चे संपादक हारीस शेख, प्रकाश महाडिक आणि पुष्पा महाडिक हे निवड समितीचे सदस्य आहेत. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments