पंढरपूर – महाराष्ट्राचा आध्यात्मिक एकात्मतेचा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाच्या पंढरीत हजारो भक्तांची मांदियाळी जमली असून पांडूरंगाच्या दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरपूर गजबजून गेले आहे. आज सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या दिंड्या पंढरपूर जवळच्या वेळापूरमध्ये दाखल होऊ लागल्या. मंदिराचा कळस दिसताच वारकर्यांनी विठूरायाच्या दर्शनासाठी धाव घेतली. आषाढी एकादशी निमित्ताने दर्शन घेणारे भाविक आज दुपारपासूनच दर्शन रांगेत उभे राहिले. दुपारपर्यंत ४५ हजार भाविकांची दर्शन रांगेत नोंद करण्यात आली.
राज्याच्या सर्वच भागातून एसटी, रेल्वे, खाजगी वाहनांच्या माध्यमातूनही लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांची सुविधा व सुरक्षेसाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा, फराळ व इतर वस्तूंच्या वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी जेवण, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहे, तसेच मुक्कामाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षीपासून विठूरायाच्या २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली असून व्हीआयपी दर्शनही बंद करण्यात आले आहे.