मुंबई (रमेश औताडे) : आपल्याच मर्जीतील कंत्राटदाराला पालिकेची तिजोरी मोकळी करून देण्याच्या हेतूने पालिकेतील अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत जो टेंडर घोटाळा केला आहे, त्यामुळे मुंबईतील पालिकेच्या अनेक शाळेतील विद्यार्थी जमिनीवर बसत आहेत. असा आरोप मुंबई काँग्रेस च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुंबई काँग्रेस मुख्यालयात केला.
माहिती अधिकारात माहिती घेत या शिक्षण घोटाळ्या संदर्भात खा. वर्षा गायकवाड यांनी पालिका अधिकारी वर्गाची पोलखोल केली आहे. यावेळी बोलताना पालिकेचे माजी नगरसेवक मोहसीन हैदर म्हणाले की, पालिका शाळेत चार लाख मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना कपडे, बॅग, पुस्तके, बेंच, असे शालेय उपयोगी साहित्य देण्यासाठी टेंडर काढले जाते. मात्र तांत्रिक मुद्दे पुढे करत काही अधिकारी टेंडर प्रक्रिया वेळकाढू व अधिक गुंतागुंतीची करून आपल्या मर्जीतील कंत्राट दाराला कंत्राट कसे मिळेल याची व्यवस्था करत असल्याने तेच तेच ठेकेदार नाव बदलून कंत्राट मिळवत आहेत. याप्रकरणी सर्व पुरावे सरकारला दिले आहेत अशी माहिती माजी नगरसेवक अश्रफ आझमी यांनी दिली. यावेळी प्रवक्ते युवराज मोहिते, संदीप शुक्ला, सुरेशचंद्र राजहंस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक भरती नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. जे शिक्षक आहेत गांभीर्याने लक्ष देत नाहीत. या सर्व मनमानी प्रकारविरिधत मुंबई काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला.