Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रविश्वासघात करणाऱ्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचाच - आदित्य ठाकरे

विश्वासघात करणाऱ्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचाच – आदित्य ठाकरे

प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये भव्य सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरत विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले. तसेच विश्वासघात करणाऱ्यांना गद्दारांना विधानसभा निवडणुकीतही धडा शिकवायचाच, अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली.

जेव्हा गद्दारी झाली आणि पन्नास खोके-एकदम ओके झाले तेव्हा आपल्या पक्षाचं काय होणार? असं वातावरण होतं. आपला पक्ष राहणार की नाही? किती लोक जाताहेत? किती थांबताहेत? असं चित्र निर्माण केलं होतं. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना बाहेर पडा, जनतेला भेटा आणि जनतेचे आशीर्वाद घेत राहा, आदेश दिले होते. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आपण जे काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं आहे. तेव्हा ज्या काही पहिल्या पाच-सहा सभा झाल्या होत्या त्यापैकी मुंबई बाहेरची पहिली सभाही कर्जतमध्येच झाली होती. तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत गद्दार गँगचे नेते, मिंधे ते सुरतवरून गुवाहाटीला पळत होते. आणि त्याच दिवशी बरोबर इथे आपली सभा झाली होती. आणि लोक आपल्यासोबत आहेत आणि महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत आहे, हे मी उद्धवसाहेबांना सांगितलं होतं. कारण आपण जे काम करून दाखवले आहे, त्यासाठी महाराष्ट्राचीच काय, देशाची जनताही आपल्यासोबत आहे, असा दृढ विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

शंकाराचार्यजी कालच घरी आले होते. उद्धवसाहेबांना आणि आम्हाला आशीर्वाद दिले. काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज माझ्या विठोबाचं दर्शन घ्यायला म्हणजे जनता जनार्दनचं दर्शन घ्यायला मी बाहेर पडलो आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हीच आपली वारी आहे. धर्मात सर्वांत मोठं पाप हे विश्वासघाताचं पाप असतं, हे शंकराचार्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मीडियासमोर ते हेच बोलले. विश्वासघातापेक्षा दुसरं मोठं कुठलंच पाप नाही. आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदू नाहीच, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर केली.

शंकराचार्य यांनी काल केलेलं विधान हे धर्माचार्य म्हणून त्यांनी सांगितलं. ते राजकारणात जात नाहीत आणि राजकारणावर बोलत नाहीत. मात्र वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेलं प्रेम, आदर आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, जे सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणारं नाही तर घरातील चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. म्हणून त्यांना आशीर्वाद द्यायला शंकराचार्य घरी आले होते. शंकराचार्यांनी खरं सांगितलं आहे. धर्मात विश्वासघाताशिवाय दुसरं कोणतंही मोठं पाप नाही. हे पाप या गद्दारांनी केलेलं आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत आपण धडा शिकवलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांना धडा शिकवायचाच, अशी गर्जना यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. हा विश्वासघात त्यांनी जो केलेला आहे तो लक्षात घ्या. ही गद्दारी फक्त शिवसैनिकांसोबत आणि उद्धव ठाकरेंशी केलेली नाही तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसून केलेली आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

आपण महत्त्वाचा एक टप्पा जिंकलोय. लोकसभेत आपला विजय झाला आहे. विजय दोन गोष्टींचा झालेला आहे. पहिली गोष्ट… जो भाजप मोदी सरकार, भाजप सरकार या पासून दूर जायला तयार नव्हता आज एनडीएचं सरकार बोलत आहे, भाजप स्वतःचं कुठेही नाव घेत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे… ज्या भाजपला आपल्या राज्यात, देशात हुकूमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाही संपवायची होती. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, ते बदलायचं होतं. आणि हे नरेटिव्ह नाही. भाषणं काढून बघा. आम्हाला चारसो पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं भाजपचे पाच सहा उमेदवार त्यावेळी बोलले होते. आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं महाराष्ट्रात पंकजा मुंडे एका सभेत बोलल्या होत्या. त्या विरोधात आपण उभे राहिलो. कारण आपण सर्व आंबेडकर प्रेमी आणि देशभक्त जनता आहोत. आपल्याला या देशाचं हित बघायचं आहे, फक्त भाजपचं नाही. आणि जर हे चारशे, तीनेश काय 272 जरी पार झाले असते तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं. आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणला असता. सर्वांचा आवाज दाबला गेला असता. मात्र, इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये जे वातावरण होतं, त्याने परिवर्तन घडलं आणि भाजपला संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे, यासाठी देशाचं अभिनंदन करतो, असे आदित्य आठारे म्हणाले.

लोकशाही वाचवण्याचा आपण जो प्रयत्न करत होतो, तो यशस्वी ठरलेला आहे. पहिला टप्पा आपण पार केलेला आहे. पण आता दुसरा टप्पाही महत्त्वाचा आहे, विधानसभेची निवडणूक लागणार आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणात विधानभा निवडणूक होणार आहे. या तीन राज्यांवर केंद्र सरकारचं भवितव्य अवलंबून आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

कर्जत येथील शेळके मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या ‘भव्य शिवसैनिक मेळाव्या’त युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. ह्यावेळी ह्यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेत्या महिला संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments