Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रकर्करुग्णांना अन्नदान करणारा अन्नमित्र : संजय सोमनाथ शेट्ये ! -योगेश वसंत त्रिवेदी,

कर्करुग्णांना अन्नदान करणारा अन्नमित्र : संजय सोमनाथ शेट्ये ! -योगेश वसंत त्रिवेदी,

प्रतिनिधी :  परळच्या टाटा हॉस्पिटलचे नांव घेतले की अंगावर काटा उभा राहतो. कारणच तसे आहे. या टाटा हॉस्पिटलची ख्याती कर्करुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमुळे सर्वदूर पसरली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून कर्करुग्ण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपचार करवून घेण्यासाठी येत असतात. बरं रुग्ण एकटाच येत नाही तर त्याचा परिवार सुद्धा इथे येतो. या कर्करुग्णांवर टाटाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका करीत असतात. पण त्यांची, त्यांच्या परिवाराची क्षुधा शांती कोण करणार, त्यांना पोटात टाकण्यासाठी दोन प्रेमाचे घास कोण देणार ? हा प्रश्न आ वासून उभा राहिला. पण तो चुटकीसरशी सोडवला एका अन्नमित्राने. या अन्नमित्राचे नांव आहे संजय सोमनाथ शेट्ये. गेल्या चार वर्षांपासून आधी दर रविवारी टाटा हॉस्पिटलच्या बाहेर कर्करुग्णांना आणि परिवारजनांना भोजन वाढण्याचे काम अव्याहतपणे संजय सोमनाथ शेट्ये यांनी सुरु ठेवले. अन्नमित्र संजय शेट्ये यांनी अन्नदानाचे पवित्र कार्य सुरु ठेवताच त्यांच्या समवेत सेवा करण्यासाठी सेवाभावी लोक पुढे येऊ लागले. ८ डिसेंबर २०२० रोजी संजय सोमनाथ शेट्ये यांना मेंदूच्या विकाराचा जोरदार झटका बसला. त्यांना लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर गिरीश सोनी यांना विचारले की संजय शेट्ये कधी बरे होणार ? तेंव्हा ते म्हणाले की पांडुरंगाच्या चरणी लीन होईपर्यंत औषधोपचार सुरु ठेवावे लागतील. संजय शेट्ये यांची रुग्णसेवा फळाला आली. ते बरे झाले. त्यांनी ठरविले की आपले उर्वरित आयुष्य हे समाजासाठी समर्पित करीन. त्यांनी सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून अहोरात्र रुग्णांना अन्न पुरविण्याचे काम सुरु ठेवले आहे. सौरभ मित्र मंडळाचे तरुण तडफदार सचिव मंगेश वरवडेकर आणि प्रफुल्ल गावडे हे त्यांना सहकार्य करीत आहेत. सुरुवातीला १६० अन्न पाकिटांनी प्रारंभ करणाऱ्या संजय शेट्ये यांनी आता मजल दर मजल करीत १८०, २००, २२५ आणि आता २५० अन्न पाकिटांवर ही संख्या पोहोचली आहे. सहकार्याचे हातही वाढू लागले आहेत. कोरोना महामारीने साऱ्या विश्वाला विळखा घातला होता तेंव्हा संजय सोमनाथ शेट्ये यांचे अन्नछत्र धूमधडाक्यात सुरु होते. त्यामुळे त्यांना जनतेने अन्नमित्र संजय सोमनाथ शेट्ये अशी ओळख मिळवून दिली. त्यांनी ग्रॅंट रोड भागातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनाही कोण काय म्हणेल याची पर्वा न करता कोरोना काळात अन्न पुरविण्याचे काम केले. कोरोना नंतर सुध्दा या महिलांच्या समस्या लक्षात घेऊन शीधा वाटप केले. जोवर माझ्या जीवात जीव आहे, श्वास सुरु आहे तोवर मी समाजाची, रुग्णांना अन्न पुरविण्याची सेवा सुरु ठेवीन असा निर्धार अन्नमित्र संजय सोमनाथ शेट्ये यांनी बोलून दाखविला आहे. अशा या अन्नमित्राला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो या मनःपूर्वक शुभेच्छा ! याठिकाणी एक आठवण जाणीवपूर्वक सांगतो की माझ्या मातोश्री ज्येष्ठ समाजसेविका , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित मनोरमा वसंत त्रिवेदी यांना ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा कर्करोग ) झाला होता आणि आमचा परिवार चिंताग्रस्त झाला होता . त्यावेळी तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी केलेल्या शिफारशीनुसार परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य रुग्णालय (के. ई. एम हॉस्पिटल) मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिल्पा राव यांनी आमच्या मातोश्रींवर यशस्वी उपचार केले आणि मातोश्री कर्करोग मुक्त झाल्या. त्यावेळी आमचा परिवार परळच्या या भागातील उपहारगृहात आपली क्षुधा शांती करीत होता. कर्करोग मुक्त झालेल्या आमच्या मातोश्री त्यांचे लहान बंधू विनोद चंदुलाल त्रिवेदी यांच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन करु शकल्या नाहीत आणि २० जानेवारी २०१६ रोजी त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली. परळ ही वैद्यकीय उपचार नगरी असून या परिसरात रुग्णांचे लाखो नातेवाईक आपापल्या पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करीत असतात त्यांच्या सेवेसाठी अन्नमित्र संजय सोमनाथ शेट्ये आणि असंख्य सेवक धावून जातात मग त्यात परेश समजिसकर व त्यांचा परिवार, दीपक कैतके आणि त्यांचा परिवार अहमहमिकेने रुग्णसेवक म्हणून झटत असतो. या तमाम सेवकांना मानाचा मुजरा. -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments