Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरविशाळगडावरील अतिक्रमणामुळे छत्रपती संभाजीराजे आक्रमक; विनायक कोरे यांच्यावर भडकले

विशाळगडावरील अतिक्रमणामुळे छत्रपती संभाजीराजे आक्रमक; विनायक कोरे यांच्यावर भडकले

प्रतिनिधी : राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडावरील अतिक्रमणावरून आक्रमक झाले आहेत. प्रशासन वारंवार विनंती करूनही विशाळगडावरती जाण्यासाठी ते ठाम आहेत.  संभाजीराजे छत्रपती उद्या सकाळी आठ वाजता ते विशाळगडाकडे शिवभक्तांसह रवाना होणार आहेत. तत्पूर्वी संभाजीराजे  यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विनय कोरे यांना काही सवाल केले आहेत.

महायुतीत गेल्यामुळे तुम्ही दबाव टाकून काहीही करणार का?
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, सरकारने विशाळगडावर ग्रामपंचायत आणि ब्रीज कसे काय बांधले? पुरातत्व खात्याचे नियम असताना इथं का नियम लावले नाहीत ? स्थानिक आमदारांनी हे दबाव टाकून केलं. या सगळ्याची सुरुवात स्थानिक आमदार विनय कोरे यांनी सुरूवात केली. महायुतीत गेल्यामुळे तुम्ही दबाव टाकून काहीही करणार का? असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विनय कोरेंना केला. 

पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, अतिक्रमण काढावं यासाठी मागणी आहे, दीड वर्षात सरकारनं काय केलं? कोर्टात याबाबत सुनावणी लावली नाही, सरकारने काय केलं? ते सांगावं. विशाळगडावर 158 अतिक्रमणे आहेत केवळ 6 अतिक्रमणांबद्दल कोर्टात केस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर हे कसं काय खपवून घेतलं जातं. मी इतके वर्षे विशाळगडावर गेलो नाही याची देखील मला खंत वाटते. मुख्यमंत्री राजसदरेवरून म्हणाले होते तुमच्या मनातील विशाळगड घडवू. मग एक देखील हेअरिंग लावली नाही. दीड वर्षात सुचलं नाही आणि मी विशाळगडावर जाणार ही घोषणा केल्यानंतर बैठकीला बोलवता का? मी जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं, माझ्यावर कोण बोट दाखवू शकत नाही. रायगड किल्ल्याचा मी एक टक्का देखील राजकारणासाठी उपयोग करून घेतला नाही. आता माझ्यावर राजकारण करतो, असे आरोप करतात हे चुकीचं आहे. मी कधीही गडकोट किल्ल्याचे राजकारणासाठी उपयोग केला नाही आणि या पुढे देखील करणार नाही.
विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावं यासाठी अनेक प्रयत्न झाले.
छत्रपती शिवाजी महाराज आजच्याच दिवशी सिद्दीचा वेढा भेदून विशाळगडावर पोहचले होते. सर्व शिवभक्तांनी उद्या विशाळगडावर जावं अशी विनंती केली. त्यानुसार उद्या सकाळी 8 वाजता विशाळगडावर जाणार आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावं यासाठी अनेक प्रयत्न झाले. मी दोन वर्षांपूर्वी गेल्यानंतर मला देखील तिथले चित्र बघून वाईट वाटलं. विशाळगडावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झालं आहे, सरकारचे देखील अनेक ठिकाणी अतिक्रमण झालं आहे.  विशाळगडावर बकरी, कोंबड्या कापले जात होते. हे सगळे बंद व्हावे ही शिवभक्तांची मागणी आहे, आम्ही शिवाजी महाराज यांना वंदन करायला जाणार आहोत, असंही संभाजीराजे म्हणाले. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments