मुंबई (शांताराम गुडेकर /डॉ.समीर खाडिलकर ) :
श्रीमती मनोरमा चौधरी यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूर येथे,विद्यार्थ्यांकरीता चित्रभरण स्पर्धा,दंत चिकित्सा व नेत्र चिकित्साचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत देवगड ते दोडामार्ग पर्यंतच्या १५७ विद्यार्थ्यानी भाग घेतला.कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, यांच्या हस्ते, श्रीम. मनोरमा चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी,सचिव संदीप साळसकर,नेरूरच्या प्रथम नागरिक भक्ती घाडीगावकर,वसुंधरा केंद्राचे व्यवस्थापक सतीश नाईक,डॉक्टर मयुरी ठाकूर,डॉक्टर जोशी,सिंधुदुर्ग न्यायालयाचे निवृत्त रजिस्ट्रार मटकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बक्षीस समारंभ राष्ट्रवादी शरद गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांचे उपस्थितीत करण्यात आला.ही स्पर्धा पहिली ते चौथी,पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन विभागामध्ये घेण्यात आली.स्पर्धकांमधून पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात सांगितले की,सध्याचे युग हे स्पर्धात्मक असल्याने,विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे,तरच या युगात आपण टिकू शकाल.याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.यावेळी विद्यार्थ्यांना,अमित सामंत, काका कुडाळकर,सरपंच भक्ती घाडी,मटकर यांनीही मार्गदर्शन केले.दयानंद चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये, ट्रस्टच्या स्थापनेपासून गेल्या २३ वर्षांमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेतला. डॉ.मयुरी ठाकूर यांच्यातर्फे विदयार्थ्यांची दंत तपासणी, तर डॉ.जोशी यांच्यातर्फे डोळ्यांची तपासणी करण्यात आली.यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर यांनी केले,तर आभार प्रदर्शन सतीश नाईक यांनी केले.
