
प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहीमा राबवून दूर्लक्षित भागांतील स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नागरिकांचा स्वच्छता कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेत नमुंमपा
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. रेल्वे स्टेशनची साफसफाई रेल्वे प्रशासन आणि सिडको यांच्यामार्फत पाहिली जात असली तरी त्याठिकाणची नियमित वर्दळ व मोठया संख्येने ये-जा करणारी नागरिकांची संख्या लक्षात घेत तेथे नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. याबाबतची जाणीव निर्माण करण्यासाठी दिघागाव रेल्वे स्टेशन परिसर व तेथील शौचालये यांची सखोल स्वच्छता मोहीमेव्दारे बारकाईने साफसफाई करण्यात आली. परिमंडळ 2 चे उपआयुक्त तथा दिघा विभाग अधिकारी डॉ.कैलास गायकवाड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या दिघागाव रेल्वे स्टेशन सखोल स्वच्छता मोहीमेत स्टेशन मास्तर व कर्मचारी तसेच तेथील स्वच्छताकर्मीही सहभागी झाले होते. उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन आणि स्वच्छता निरीक्षकांसह स्वच्छतामित्रही या मोहीमेत सहभागी झाले होते. अशाच प्रकारची सखोल स्वच्छता मोहीम कोपरखैरणे विभागात सहा.आयुक्त् तथा विभाग अधिकारी श्री.सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी श्री.राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली से.16 लक्ष्मी मिनी मार्केट तसेच से.11 फाम सोसायटी मध्ये राबविण्यात आली. यावेळी मार्केटमधील व्यावसायिक व सोसायटीमधील नागरिक आपापल्या क्षेत्रातील स्वच्छता मोहीमेत उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मार्केट व सोसायटीमधील अंतर्गत व परिसर स्वच्छतेची जबाबदारी संबंधित व्यावसायिक आणि नागरिकांची असल्याचे संबंधितांच्या लक्षात आणून देण्यात आले व स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नियमित स्वच्छता राखणेबाबत जाणीव जागृती करण्यात आली. तुर्भे विभागामध्येही सहा.आयुक्त् तथा विभाग अधिकारी श्री.भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री.जयेश पाटील यांच्या माध्यमातून स्वच्छता निरीक्षक व सफाई मित्रांच्या सहयोगाने से.19 तुर्भे येथील फॉर्च्युन हॉटेल परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी अस्वच्छतेबाबत दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली. ऐरोली विभागात सहा.आयुक्त् श्री.अशोक अहिरे आणि उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या संकल्पनेतून स्वच्छतादूत व स्वच्छता पर्यवेक्षक यांच्याकरिता ईएचएस शिक्षा फाऊन्डेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इेएचएसचे मार्गदर्शक श्री.खैरनार यांनी आपत्ती उद्भवल्यास घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कचऱ्याशी संबंध येत असल्याने विशेषत्वाने पावसाळी कालावधीत आरोग्य जपणूकीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साहित्याचा वापर करावा व काम करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. याशिवाय से.10 ऐरोली येथील ब्रीजव्हयू सोसायटीमध्ये प्लास्टिक पिशव्या बंदीची मोहीम राबवत तेथील नागरिकांच्या सहयोगाने प्लास्टिक फ्री सोसायटी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कापडी पिशव्यांचे सोसायटी सदस्यांना वाटप करण्यात आले तसेच त्याठिकाणी क्लॉथ् बॅग बँक उपक्रमाचा शुभारंभही करण्यात आला. महापालिका आयुकत डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त् आयुक्त् श्री.सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त् डॉ.अजय गडदे आणि परिमंडळ उपआयुक्त् श्री.सोमनाथ पोटरे व डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली सर्वच विभाग कार्यक्षेत्रात सखोल स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.